रांची : आपल्या मतदारसंघात नगरसेवक, आमदार, खासदार एखाद्या खेळाची किंवा नृत्याची स्पर्धा आयोजित केल्याचं आजपर्यंत तुम्ही पाहिलं असेल. मात्र, एका आमदाराने आपल्या मतदारसंघात चक्क चुंबन स्पर्धा आयोजित केल्याचा प्रकार समोर आला आहे.
आदिवासी समाजातील नागरिकांमध्ये प्रेमाची भावना निर्माण करण्यासाठी आणि मॉडर्न लाईफस्टाईलला चालना देण्यासाठी चक्क चुंबन स्पर्धा आयोजित करण्यात आली.
झारखंडमधील पाकुड जिल्ह्यात ही अनोखी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. शनिवारी रात्री लिट्टीपाडा आमदार सायमन मरांडी यांच्या तालपहाडी गावात किसिंग स्पर्धा ठेवण्यात आली होती.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिदो-कान्हू मेळाव्यात आयोजित ही अनोखी चुंबन स्पर्धा सर्वांचचं आकर्षणाचं केंद्र बनली. अशा प्रकारच्या स्पर्धेचं पहिल्यांदाच आयोजन करण्यात आलं होतं त्यामुळे बघ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात होती.
या स्पर्धेत १८ जोडप्यांनी सहभाग घेतला आणि न लाचता चुंबन स्पर्धेचा आनंद लुटला.
याचवर्षी लिट्टीपाडा पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या झामुमो आमदार सायमन मरांडी यांनी या स्पर्धेवर बोलताना म्हटलं की, "प्रेम आणि मॉडर्नायजेशनला प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे. आदिवासी समाजातील नागरिक थोडे लाजाळू असतात. अशा स्पर्धांमुळे पती-पत्नीतील प्रेमही वाढण्यास मदत होईल".
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनेकांनी या चुंबन स्पर्धेला जोरदार विरोध केला. हिंदू जागरण मंच आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी या स्पर्धेचा विरोध केला. हिंदू जागरण मंचाचे संताल परगना प्रभारी मुकेश कुमार शुक्ला यांनी म्हटले की, आदिवासी समाजाला बदनाम करण्यासाठी हे सर्व सुरु आहे. अशा स्पर्धा कुठल्याही परिस्थितीत होता कामा नये".