मोठी बातमी! उद्धव ठाकरेंचा CM देवेंद्र फडणवीसांना फोन; दोघं नेमकं काय बोलले?

Uddhav Thackeray Call Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी फोन केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 12, 2024, 02:23 PM IST
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंचा CM देवेंद्र फडणवीसांना फोन; दोघं नेमकं काय बोलले?
दोन्ही नेत्यांचं एकमेकांशी झालं बोलणं (फाइल फोटो)

Uddhav Thackeray Call Devendra Fadnavis: मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरेंनी फोन केल्याची माहिती समोर येत आहे. फडणवीस यांनी 5 डिसेंबर रोजी तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ठाकरेंनी त्यांना फोन केला होता असं सूत्रांनी सांगितलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोनवरुन शुभेच्छा दिल्या होत्या. ठाकरेंनी फडणवीसांचे अभिनंदन केले होते. शपथविधीच्या दुसऱ्या दिवशी ठाकरेंनी फडणवीसांना फोनवरून त्याचं अभिनंदन केलं होतं असं सूत्रांनी म्हटलं आहे.

Add Zee News as a Preferred Source

फडणडणवीसांनाही केलेला फोन

शपथविधी पूर्वी फडणवीस यांनीही उद्धव ठाकरे यांना फोन करुन निमंत्रण दिलं होतं. मात्र मुंबई महानगरपालिकेसमोरील आझाद मैदान येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींसहीत केंद्रीय गृहमंत्री आणि अनेक भाजपाशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या शपथविधी सोहळ्याला ठाकरे गैरहजर होते. मात्र प्रत्यक्षात सोहळ्याला उपस्थित राहिले नसले तरी ठाकरेंनी फडणवीस यांना फोन करून शुभेच्छा दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे यामधून आता पुन्हा काही नवीन राजकीय समिकरणं जुळून येतात का याबद्दलच्या चर्चा दबक्या आवाजात सुरु आहेत. 

दोघांमध्ये दुरावा

2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपामध्ये मुख्यमंत्रिपदावरुन वाजल्यानंतर ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मदतीने महाविकास आघाडी सरकारचं मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. 2019 च्या ठाकरेंच्या शपथविधीला फडणवीस उपस्थित होते. मात्र त्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय दुरावा वाढत गेल्याचं दिसून आलं. अशातच आता दोघांमध्ये फोनवरुन चर्चा झाल्याची बातमी समोर येत आहे.

ठाकरेंच्या अनुपस्थितीवरुन टीका

5 डिसेंबर रोजी मुंबईमधील फोर्ट परिसरातील आझाद मैदानावर झालेल्या महायुती सरकारच्या शपथविधीसाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवारांनाही निमंत्रण पाठवण्यात आलं होतं. मात्र हे दोन्ही नेते शपथविधीला उपस्थित नव्हते. यावरुन भारतीय जनता पार्टीने उद्धव ठाकरेंवर टीकाही केली होती. "हिच तर महाराष्ट्रविरोधी कोती मनोवृत्ती," असं म्हणत भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी विरोधकांवर शपथविधी सोहळ्यातील अनुपस्थितीवरुन दुसऱ्या दिवशी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमधून सुनावलं होतं. "काल आझाद मैदानावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा तर एकनाथ शिंदे व अजित पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. या समारंभापासून व्यक्तीगत आमंत्रण देऊनही उद्धव ठाकरे, शरद पवार व काँग्रेसचे नेते गैरहजर राहिले. हा लोकांनी निवडून दिलेल्या सरकारचा शपथविधी होता. लोकशाहीत लोकांनी दिलेला कौल स्वीकारून हे नेते शपथविधीला आले असते तर खरंच या नेत्यांना महाराष्ट्र हिताची व संविधानाची चाड आहे असा अर्थ निघाला असता. महाराष्ट्राचा विकासासाठी आम्ही एक आहोत असा संदेश दिला गेला असता," असं केशव उपाध्ये यांनी म्हटलं  होतं.

About the Author

Swapnil Ghangale

स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.

...Read More