बंगळुरु : बंगळुरु येथील इस्त्रोच्या अंतराळ कक्षाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली. त्यांनी चांद्रयान २ मिशन संदर्भात देशाला संबोधित केले. इस्त्रो चीफ सिवन त्यांना सोडण्यास बाहेर आले. यावेळी भावूक झालेल्या सिवन यांची पंतप्रधान मोदी यांनी गळाभेट घेत पाठ थोपटून त्यांचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला.
जेव्हा विक्रम लॅंडरशी संपर्क तुटला तेव्हा तुम्ही सर्वजण भावूक झालात हे मी पाहत होतो. भारतमातेची मान अभिमानाने ऊंच करण्यासाठी तुम्ही पूर्ण आयुष्य पणाला लावता. तुम्ही कित्येक रात्री झोपलाही नाही आहात. भलेही काही अडथळे आले असतील पण आमचा आत्मविश्वास कमी झाला नाही आहे. तो आणखी मजबूत झाल्याचे पंतप्रधान मोदींनी यावेळी म्हटले. यावेळी पंतप्रधानांनी शास्त्रज्ञांचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्या कुटुंबियांचेही कौतुक केले.
#WATCH PM Narendra Modi hugged and consoled ISRO Chief K Sivan after he(Sivan) broke down. #Chandrayaan2 pic.twitter.com/bytNChtqNK
— ANI (@ANI) September 7, 2019
चंद्राच्या जमिनीपासून 2 किलोमीटर 100 मीटर उंचीवर असतांना बंगळुरु इथल्या नियंत्रण कक्षाशी विक्रम लँडरचा असलेला संपर्क हा तुटला. तेव्हाच गेले काही मिनिटे उल्हासित असलेल्या इस्त्रोच्या शास्त्रज्ञांच्या चेहऱ्यावरील हास्य गायब झाले आणि या मोहिमेत काहीतरी गडबड झाली असल्याचं स्पष्ट झालं.
काही प्रयत्न केल्यानंतरही विक्रम लँडरशी संपर्क होत नसल्याचं स्पष्ट झाल्यावर इस्त्रोचे अध्यक्ष डॉ के सीवन यांनी नियंत्रण कक्षातील जागा सोडली आणि पंतप्रधान यांना या मोहिमेत काही गडबड झाल्याची माहिती दिली. ही माहिती देतांना इस्त्रोचे अध्यक्ष भावूक झाले होते. तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या इस्त्रोच्या माजी अध्यक्षांनी सीवन यांना धीर देत आत्तापर्यंतच्या चांद्रयान 2 मोहिमेच्या वाटचालीबद्दल कौतुक केले. मग सीवन यांनी मोहिमेत काही गडबड झाल्याचं उपस्थितांसह देशासमोर स्पष्ट केलं. मग पंतप्रधानांनी मोदी यांनी नियंत्रण कक्षात असलेल्या शास्त्रज्ञांसमोर जात त्यांना धीर दिला. शास्त्रज्ञांचा देशाला अभिमान असल्याचं सांगितलं.
विक्रम लँडर जरी चंद्रावर अलगद उतरण्यात अपयशी ठरला असला तरी चंद्राभोवती फिरणारे ऑर्बिटर अजुनही व्यवस्थित काम करत आहे. ऑर्बिटर आणि विक्रम लँडरच्या उपलब्ध माहितीच्या आधारे लवकरच अधिकची माहिती समोर येईल. तेव्हा चांद्रयान -2 मोहिमेतील एक टप्पा अयशस्वी ठरला असला तरी ऑर्बिटरमुळे चांद्रयान - 2 मोहीम ही पुढील किमान एक वर्ष सुरुच रहाणार आहे. या मोहिमेत आतापर्यंत केलेल्या वाटचालीबद्दल इस्त्रोचा देशाला अभिमान आहे.