Viral Video : खेळ म्हटलं की हार-पराजय आलंच. क्रिकेट असो की फूटबॉल किंवा इतर कोणताही खेळ असो, एका संघाचा विजय आणि दुसऱ्या संघाचा पराभव हे आलंच. खेळात पराभव झाला की वाईट हे वाटतंच. पण पराभव विसरून नव्या जिद्दीने मैदानावर उतरणं यालाच खिलाडीवृ्त्ती म्हणतात. यात महत्त्वाची भूमिका असते ती संघाच्या प्रशिक्षकाची (Coach). पराभवानंतरही खेळाडूंमध्ये नवी जिद्द, नवी उमेद निर्माण करुन जिंकण्यासाठी तयार करण्याचं काम प्रशिक्षक करतो. पण सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला असून हा प्रशिक्षक आहे की राक्षस असा प्रश्न युजर्सना पडला आहे. संघाच्या पराभवानंतर प्रशिक्षक आपल्या खेळाडूंना चक्क लाथा-बुक्क्यांनी मारहाण करताना या व्हिडिओत दिसत आहे.
काय आहे नेमकी घटना?
व्हायरल होणार हा व्हिडिओ तामिळनाडूतला (Tamilandu) आहे. सलेम जिल्ह्यातील अन्नामलाई शाळेतील शारीरिक शिक्षक मुलांना अमानुष मारहाण करताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार अन्नामलाई शाळेचा फूटबॉलचा संघाचा एका शालेय सामन्यात पराभव झाला. पण हा पराभव प्रशिक्षक पचवू शकला नाही. पराभव का झाला याचा जाब विचारत हा शिक्षक मुलांना मारहाण करतोय. धक्कादायक म्हणजे काही मुलांच्या छातीवरही या प्रशिक्षकाने लाता मारल्यात. पराभवाचं कारण विचारताना तुम्ही बायका आहात का? असा सवाल विचारतानाही या व्हिडिओत ऐकायला येतंय. प्रशिक्षकच्या मारहाणीमुळे मुलं अक्षरश: घाबरलेली दिसत आहेत.
प्रशिक्षक निलंबित
विद्यार्थ्यांना मारहाणीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्याच्या शिक्षण विभागाने प्रशिक्षकाला निलंबित केलं असून तपास सुरु केला आहे. प्रकरणाचा अहवाल तयार करुन तो जिल्हा आयुक्तांना सोपवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओनंतर एक्सवर युजर्समध्ये वाद निर्माण झाला आहे. काही युजर्सने प्रशिक्षकाचा वागणं अतिशय कठोर असल्याचं म्हटलं आहे. तर चांगला संघ घडवण्यासाठी काही वेळा कठोर व्हावं लागतं असं काही युजर्सचं मत आहे.
Tf! This is How Coach meeting with the team team after they lost the match
pic.twitter.com/BnKsrysbBy— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) August 12, 2024
सोशल मीडियावर वाद
हा व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या युजरने एक्स अकाऊंटवर शेअर केला आहे. आतापर्यंत 10 लाखाहून अधिक युजर्सने हा व्हिडिओ पाहिलाय. तर अनेक लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. या व्हिडिओवरुन सोशल मीडियावर दोन ग्रुप बनलेत. एका ग्रुपने प्रशिक्षकला कठोर शिक्षेची मागणी केली आहे. तर एका ग्रुपने प्रशिक्षकाला पाठिंबा दिला आहे. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकायचंय, तर कठोर प्रशिक्षणाची आणि कठोर प्रशिक्षकाची सवय करुन घ्यायला हवी असं काही जणांचं म्हणणं आहे. तर प्रशिक्षकाने अशी वागणूक दिली, तर पदक जिंकण्याआधीच खेळाडू खेळातून संन्यास घेतील असं काही युजर्सचं मत आहे.