Viral Video : भारतीय रेल्वे (Indian Railway) ही जशी सरकारची संपत्ती आहे तशी तुमचीसुद्धा आहे. पण ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या अशा प्रवाशांचीसुद्धा संख्या कमी नाही, जे प्रवासादरम्यान मिळालेली उशी, चादर, ब्लॅंकेट यांना स्वतःचे समजतात आणि ते सामानासह घेऊन निघतात. रेल्वेच्या एसी (AC Train) डब्यांमध्ये उशा, चादरी आणि टॉवेल घरी घेऊन जाणाऱ्या प्रवाशांमुळे रेल्वे प्रशासन त्रस्त आहे. प्रवाशांच्या या सवयीमुळे रेल्वेचे दरवर्षी लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. अशातच एका रेल्वेच्या चादरी घरी घेऊन जाणाऱ्या प्रवाशाचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय.
ट्रेनमध्ये प्रवास करताना एसी कोचमध्ये प्रवाशांना बेडशीट, उशा आणि टॉवेल दिले जातात. पण काही लोक ते स्वतःचे समजून ते घरी नेण्याचा प्रयत्न करतात.यामुळे रेल्वेला मोठं नुकसान होत आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेने अशा प्रत्येक डब्यात एक अटेंडंट ठेवला आहे. मात्र एका प्रवाशाने त्या कर्मचाऱ्यावरच बेडशीट आणि उशी चोरल्याचा आरोप केला होता. त्यानंतर या प्रवाशाची चोरी पकडली गेली आणि याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. रेल्वेतून उतरण्याच्या तयारीत असलेल्या एका प्रवाशाच्या बॅगेत रेल्वेची चादर आणि उशी सापडली. त्यानंतरही या प्रवाशाने अरेरावीने उत्तरे देणे सुरुच ठेवले होते. मात्र एका कोच अटेंडंटने त्यांना पकडून व्हिडिओ शूट केला.
व्हायरल व्हिडीओमध्ये, एका कुटुंबात आणि रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये वाद सुरू आहे. कर्मचारी सतत आरपीएफला फोन करून बॅग तपासण्याची मागणी करत आहेत. यानंतर प्रवासी त्याच्या बॅगेतून एक एक करून चादर बाहेर काढत आहे. प्रवाशाच्या बॅगेत तीन चादर असल्याचा दावा रेल्वे कर्मचाऱ्याने केला आहे. एवढं होऊनही ती व्यक्ती रेल्वे कर्मचाऱ्यांशी वाद घालत आहे.
हा व्हिडिओ 6 ऑक्टोबर 2022 चा जौनपूर उत्तर प्रदेशातील असल्याचे म्हटलं जात आहे. भाजप आमदार शाल्भमणी त्रिपाठी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.
वंदेभारत ट्रेन पर पथराव करेंगे,बाकी ट्रेनों से चादर तकिया चुराएँगे,फिर कहेंगे “हम पर” शक करते हैं !! pic.twitter.com/QjQJO0ZwD1
— Dr. Shalabh Mani Tripathi (@shalabhmani) May 27, 2023
दरम्यान, रेल्वे प्रवासी केवळ चादरी, ब्लँकेट, टॉवेल, उशाचे कव्हरच नाही तर चमचे, किटली, नळ, फ्लश पाईप्स देखील चोरत असल्याचे समोर आहे. रेल्वेच्या राष्ट्रीय संपत्तीला लोक स्वतःची संपत्ती समजत आहेत. पण त्यामुळे रेल्वेचे मोठे नुकसान होत आहे. रेल्वेच्या सामानाची चोरी करणे बेकायदेशीर आहे. रेल्वे मालमत्तेची चोरी किंवा नुकसान केल्याबद्दल रेल्वे मालमत्ता कायदा 1966 नुसार कारवाई केली जाऊ शकते. रेल्वे मालमत्तेची चोरी किंवा नुकसान झाल्यास दंड आणि तुरुंगवास अशा दोन्ही शिक्षा आहेत. यासाठी कमाल 5 वर्षांची शिक्षा आहे.