व्हिडिओ : तरुणाला वाचवण्यासाठी हिंसक गर्दीशी भिडला पोलीस अधिकारी

या पोलीस अधिकाऱ्याचं नाव सब इन्स्पेक्टर गगनदीप सिंह असं आहे. ही घटना 22 मे रोजी घडल्याचं सांगण्यात येतंय. 

Updated: May 25, 2018, 09:48 PM IST
व्हिडिओ : तरुणाला वाचवण्यासाठी हिंसक गर्दीशी भिडला पोलीस अधिकारी title=

नवी दिल्ली  : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ वेगानं वायरल होताना दिसतोय. या व्हिडिओमध्ये हिंसक घोळक्याकडून एका तरुणाला मारहाण होताना दिसतेय... पण, या तरुणाला वाचवण्यासाठी एका पोलीस अधिकाऱ्यानं आपले प्राण पणाला लावले... आणि आपलं कर्तव्य बजावलं.  खरं म्हणजे, या घटनेला धार्मिक अपप्रवृत्तीची पार्श्वभूमीही आहे. त्यामुळेच या पोलीस अधिकाऱ्याचं सगळीकडून कौतुक होतंय. पोलीस घटनास्थळी नसता तर हा मुलगा हिंसक प्रवृत्तीच्या लोकांच्या ताब्यात सापडला असता. ही घटना उत्तराखंडच्या नैनीतालची आहे. या पोलीस अधिकाऱ्याचं नाव सब इन्स्पेक्टर गगनदीप सिंह असं आहे. ही घटना 22 मे रोजी घडल्याचं सांगण्यात येतंय. 

मुस्लिम मुलगा - हिंदू मुलगी

मिळालेल्या माहितीनुसार, 22 मे रोजी नैनीतालमध्ये एका मंदिरात एक मुलगा - मुलगी बसलेले होते. त्यांना एकत्र पाहून काही लोकांनी त्यांची चौकशी करायला सुरुवात केली. त्यामध्ये मुलगा मुस्लिम आणि मुलगी हिंदू असल्याचं समोर आलं. एकमेकांना भेटण्यासाठी ते मंदिरात आले होते. परंतु, मुलगा मुस्लिम आहे हे लक्षात येताच लोकांनी त्याला धक्काबुक्की सुरू केली. मुलीनं त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु, लोकांनी तिला बाजुला केलं.

पोलिसांची सतर्कता

गर्दी वाढत गेली... आणि या गर्दीनं हिंसेची भूमिका घेतली. काहीतरी गडबड असल्याचं लक्षात येताच पोलीस सब इन्स्पेक्टर गगनदीप सिंह आणि इतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गर्दीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु, गर्दीचा रोष वाढत होता. 

अशा वेळी गगनदीप सिंह यांनी गर्दीची पर्वा न करता या तरुणाला सुरक्षित घटनास्थळावरून बाजुला नेलं... लोक तरुणाला मारहाणीचा प्रयत्न करत होते.... आणि सिंह त्याला आपल्याकडे खेचून वाचवण्याचा प्रयत्न करत होते... ही घटना कॅमेऱ्यातही कैद झालीय... 

मिळालेल्या माहितीनुसार, मुलगा आणि मुलगी दोघंही सज्ञान आहेत. या घटनेनंतर या पोलिसाच्या बहाद्दुरीचं आणि सतर्कतेचं सगळीकडूनच कौतुक होतंय.