लखनऊ: आझम खान यांनी भाजप नेत्या जयाप्रदा यांच्यावर नुकतीच पातळी सोडून टीका केली होती. यावरून बराच गदारोळही निर्माण झाला होता. त्यानंतर आता आझम खान यांचे पूत्र अब्दुल्ला आझम खान यांनीही या वादात उडी घेतली आहे. अब्दुल्ला यांची जीभही आपल्या वडिलांप्रमाणे घसरली. त्यांनी जयाप्रदा यांना 'अनारकली' असे म्हणून हिणवले आहे. रामपूर येथील प्रचारसभेत बोलताना रामपूर यांनी म्हटले की, अली आणि बजरंगबली दोघेही आमचेच आहेत. त्यामुळे आम्हाला अलीही हवा आणि बजरंगबलीही हवेत. मात्र, अनारकली नकोय. त्यामुळे साहजिकच नव्या वादाला तोंड फुटले आहे.
जयाप्रदा यांनीही अब्दुल्ला यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले की, बाप तसाच बेटा आहे. यावर मला हसावे की रडावे हेच कळत नाही. मी अब्दुल्लाकडून ही अपेक्षा केली नव्हती. अब्दुल्ला सुशिक्षित आहे. त्याच्या वडिलांनी मला आम्रपाली म्हटले आणि आता अब्दुल्लाने मला अनारकली म्हटले. तुम्ही महिलांकडे याच दृष्टीकोनातून पाहता का, असा सवाल जयाप्रदा यांनी विचारला.
आझम खान यांच्या अश्लील शेरेबाजीवर भडकल्या रेणुका शहाणे
यापूर्वी आझम खान यांनी अत्यंत खालच्या भाषेत जयाप्रदा यांना लक्ष्य केले होते. यावेळी त्यांनी जयाप्रदा यांचा अप्रत्यक्षपणे उल्लेख करताना म्हटले होते की, ज्यांना आम्ही हात धरून रामपूरमध्ये आणले, या मतदारसंघाचे प्रतिनिधितव करायची संधी दिली. त्यांचा खरा चेहरा समजण्यासाठी १७ वर्षे लागली. मी केवळ १७ दिवसांमध्ये त्यांना पुरते ओळखले होते. त्यांचे अंतर्वस्त्र खाकी रंगाचे आहे, हेदेखील मला ठाऊक होते, असे आझम खान यांनी म्हटले होते. यापूर्वीही आझम खान यांनी जयाप्रदा यांना नाचगाणे करणारी बाई म्हणून हिणवले होते.