Wayanad Landslide: वायनाडमधील अनेक गावांवर दरड कोसळल्याच्या पाच दिवसानंतरही 200 हून अधिक लोक बेपत्ता आहेत. शनिवारी या दुर्गघटनेतील मृतांची संख्या 357 वर पोहचली असून अजूनही लोकांचा शोध गेतला जात आहे. असं असतानाच आता या भीषण दुर्घटनेमधून बचावलेल्यांच्या थक्क करणारे अनुभव आणि घटनाक्रम समोर येत आहेत. या दुर्घटनेमधून बचावलेल्या एका कुटुंबाला चक्क हत्तीच्या कळपाने वाचवल्याचा दावा या कुटुंबानेच केला आहे.
वायनाडमधील दुर्घटनेमधून सुखरुप बचावलेल्या काही भाग्यवंतांमध्ये सुजाता अन्नीनाचिरा यांचाही समावेश होता. सुजाता यांनी त्यांचं घर चुरालमाल येथील दरड दुर्घटनेमध्ये पूर्णपणे गाडलं गेल्याचं सांगितलं. दरड कोसळत असताना सुजाता यांचं संपूर्ण कुटुंब गावाजळव असलेल्या डोंगरावर पळालं. मात्र त्या ठिकाणी त्यांचा सामना जंगली हत्तींच्या कळपाशी झाला, असं सुजाता यांनी घटनाक्रम सांगताना नमूद केलं.
सामान्यपणे जंगलामधील हत्ती हे फार आक्रमक असतात. माणसांना पाहिल्यावर ते पळ काढतात किंवा थेट हल्ला करतात. मात्र नैसर्गिक आपत्ती कोसळलेली असताना या जंगली हत्तींनीच सुजाता यांच्या कुटुंबाचा जीव वाचवल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 'एशिया नेट न्यूज'शी बोलताना सुजाता यांनी, आपण जेव्हा हत्तींचा कळप पाहिला जेव्हा हात जोडले आणि त्यांना आमची रक्षा करा अशी प्रार्थना केल्याचं सांगितलं. आश्चर्याची बाब म्हणजे यानंतर हत्तींनी या कुटुंबातील एकाही व्यक्तीला कोणत्याही प्रकारची इजा होऊ दिली नाही. हत्तींचा कळप आमच्या भोवती सुरक्षाकडं निर्माण करावं तसा उभा होता, असं सुजाता म्हणाल्या. सुजाता यांनी हा दैवी चमत्कार असल्याचा दावा केला आहे.
दुसऱ्या दिवशी म्हणजे दुर्घटनेच्या 4 तासांनंतर सुजाता आणि त्यांच्या कुटुंबियांना मदतकार्य करणाऱ्या टीमने सुखरुप स्थळी हळवलं. सध्या मीपाडी येथील जीएसएसएसच्या कॅम्पमध्ये राहत असेलल्या सुजाता यांनी, "ते हत्ती आमच्यापासून अवघ्या अर्ध्या मीटरवर होते. ते हत्ती सुद्धा घाबरल्यासारखे वाटत होतं. मी त्यांना हात जोडून विनंती केली, "मी आताच एका नैसर्गिक आपत्तीमधून बचावले आहे. मला आणि माझ्या कुटुंबाला सोडून द्यावे. केवळ आजची रात्र आम्हाला इथे जंगलामध्ये जोपर्यंत आम्हाला कोणी वाचवायला येत नाही तोपर्यंत आसरा द्यावा," असं म्हटलं. आम्ही त्या हत्तींच्या पायापासून फार कमी अंतरावर होतो. मात्र त्यांना आमची विनंती समजल्याप्रमाणे ते अगदी शांत होते. आम्ही तिथे पहाटे सहावाजेपर्यंत होतो. सकाळी आम्हाला मदतकार्य करणाऱ्या टीमने घेऊन जाईपर्यंत ते हत्ती आमचं राखणं करत उभे होते. त्यांच्या डोळ्यात मला आत्मियता जाणवली," असं सुजाता यांनी या अनुभवाबद्दल सांगितलं.
दरड कोसळली जेव्हा डोंगरावरुन येणारं पाणी समुद्रात असल्याप्रमाणे येत होतं, असं सुजाता यांनी सांगितलं. झाडं पाण्यावर ओंडक्याप्रमाणे तरंगत होती. आमच्या शेजारची दोन मजली इमारत वाहून गेल्याचं आम्ही आमच्या डोळ्याने पाहिजे, असं सुजाता यांनी सांगितलं.