शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या मोदी सरकारला धडा शिकवावाच लागेल- शरद पवार

सात हजार कोटी बुडवणाऱ्या उद्योगपतींना सरकार कर्जमाफी देते पण गरीब शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास सरकारकडे पैसे नाहीत

Updated: Nov 30, 2018, 06:26 PM IST
शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या मोदी सरकारला धडा शिकवावाच लागेल- शरद पवार title=

नवी दिल्ली: शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या मोदी सरकारला धडा शिकवा, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले. ते शुक्रवारी दिल्लीतील शेतकरी मोर्चाच्या व्यासपीठावरून बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, केंद्रातील मोदी सरकारने देशातील शेतकऱ्यांवर प्रचंड अन्याय केला आहे. आतापर्यंत जे झाले ते पुरे. यापुढे आम्ही गप्प बसणार नाही. सात हजार कोटी बुडवणाऱ्या उद्योगपतींना सरकार कर्जमाफी देते पण गरीब शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास सरकारकडे पैसे नाहीत, या सरकारला धडा शिकवावाच लागेल, असे पवारांनी म्हटले. 

स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करा आणि कर्जमाफी या प्रमुख मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी हा मोर्चा काढला आहे. या मोर्चात स्वाभिमानी शेतकरी संघटना, किसान सभा, राष्ट्रीय किसान मजदूर संघटना, किसान एकता संघटना, भारतीय किसान युनियन अशा २०८ संघटनांचे सदस्य शेतकऱ्यांचा समावेश आहे. 

या मोर्चाला देशातील २१ राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला होता. या सर्व पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन संसद मार्गावर जनसंसद भरवली. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी, सीपीएम नेते सीताराम येचुरी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, योगेंद्र यादव, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, समाजवादी नेते धर्मेंद्र यादव, तृणमूलचे नेते दिनेश त्रिवेदी, जेडीयू नेते शरद यादव, गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी आदी नेत्यांनी या किसान संसदेला हजेरी लावत मोदी सरकारवर टीका केली.