भरधाव बसची ऑटोरिक्षाला धडक, भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू

या भीषण अपघातानंतर पंतप्रधान मोदींनी मृतांच्या कुटुंबियांना दोन लाखांची मदत जाहीर केली आहे

Updated: Aug 9, 2022, 10:02 PM IST
भरधाव बसची ऑटोरिक्षाला धडक, भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू title=

पश्चिम बंगालमधील (West Bengal) बीरभूम येथे राष्ट्रीय महामार्ग-60 वर राज्य परिवहन महामंडळाच्या बसला ऑटोरिक्षाने (Auto)  धडक दिल्याने नऊ जण ठार झाले. रामपूरहाटजवळील मल्लारपूर येथे सरकारी बसने ऑटोरिक्षाला समोरासमोर धडक दिल्याने हा अपघात झाल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि रामपुरहाट पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. बीरभूमचे पोलीस अधीक्षक नागेंद्र नाथ त्रिपाठी यांनी सांगितले की, मृत्यू झालेल्या सर्व जण ऑटोरिक्षात होते. मृतांचे मृतदेह ऑटोतून बाहेर काढण्यात आले. ऑटोचालकाला गंभीर अवस्थेत रामपूरहाट मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

पंतप्रधानांकडून मदत जाहीर

बीरभूम, पश्चिम बंगालमध्ये झालेल्या भीषण अपघाताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले. तसेच प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

बीरभूम जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पीडितांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. बंगालचे वाहतूक मंत्री फरहाद हकीम यांनीही पत्रकार परिषदेत सांगितले की, सरकारी नियमांनुसार पैसे दिले जातील. विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या सरकारी बसने ऑटोला धडक दिली.

हा अपघात इतका भयंकर होता की, यामध्ये ऑटोरिक्षाचा चुराडा झाला. या अपघातात रिक्षामधील 9 जणांना आपला जीव गमवावा लागला. कोणालाही सावरण्याची संधी मिळाली नाही.