NEET Mess : नीट परीक्षेच्या निकालाचा नेमका वाद काय? राहुल गांधी ते सर्वोच्च न्यायालय, पाहा संपूर्ण प्रकरण

NEET 2024 exam result controversy : नीट परीक्षेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप होतोय. संपूर्ण देशभरातल्या विद्यार्थ्यांमध्ये यामुळे संतापाचं वातावरण आहे. नीट परीक्षा पुन्हा घेण्याची मागणीही जोर धरू लागलीये. सुप्रीम कोर्टात (Supreme Court) दाखल केलेल्या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. 

सौरभ तळेकर | Updated: Jun 10, 2024, 09:14 PM IST
NEET Mess : नीट परीक्षेच्या निकालाचा नेमका वाद काय? राहुल गांधी ते सर्वोच्च न्यायालय, पाहा संपूर्ण प्रकरण title=
NEET 2024 exam result controversy

NEET 2024 implementation : नीट परीक्षेतल्या सावळ्या गोंधळावरुन देशभरात संतापाची (NEET 2024 exam result controversy) लाट उसळलीय. राज्यातही त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. नीट परीक्षा रद्द करुन पुन्हा नव्याने परीक्षा घेण्याची मागणी विद्यार्थी करत आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांनी मुक निदर्शनं केली. तर पुण्यात अभाविपनेही आक्रमक आंदोलन केलं. नीट परीक्षेतल्या घोटाळ्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचं मेडिकलच्या प्रवेशाचं स्वप्न अधुरं राहिलंय. विद्यार्थ्यांनी आता सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. नीट परीक्षेच्या कथित घोटाळ्याची SIT मार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात (Supreme Court) दाखल करण्यात आलीय. 

NEET चा सावळा गोंधळ

वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी कॉलेज प्रवेशासाठीची प्रवेश परीक्षा घेण्यात येते. 720 मार्क्सच्या परीक्षेत योग्य पर्याय निवडून उत्तर द्यावं लागलंत. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 4 मार्क तर चुकीच्या उत्तरासाठी 1 मार्क कापला जातो. NEET मध्ये पहिल्यांदाच 67 मुलांना पैकीच्या पैकी 720 गुण मिळाले. 67 टॉपर्सपैकी 6 जणांनी हरियाणातल्या एकाच सेंटरमधून परीक्षा दिली होती. टॉपर्स मुलांना 718 आणि 719 असे गुण मिळाले, जे मार्क देण्याच्या पद्धतीत बसत नाहीत असा आरोप करण्यात आलाय.

नीट परीक्षेच्या सावळ्या गोंधळावरून काँग्रेस नेते राहुल गांधींनी मोदी सरकारवर घणाघात केलाय. "नरेंद्र मोदींनी अद्याप शपथही घेतली नाही आणि नीट परीक्षेतील हेराफेरीने २४ लाखांहून अधिक विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त केले. एकाच परीक्षा केंद्रातील ६ विद्यार्थी सर्वाधिक गुण मिळवून अव्वल आले आहेत. किती जणांना असे गुण मिळालेत जे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही..आज मी देशातील सर्व विद्यार्थ्यांना आश्वासन देतो की मी संसदेत तुमचा आवाज बनेन आणि तुमच्या भविष्याशी संबंधित मुद्दे जोरदारपणे मांडेन, असं राहुल गांधींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.

दरम्यान, नीट परीक्षेतल्या घोटाळ्यामुळे विद्यार्थ्यांसह त्यांचं कुटुंबही चिंतेत आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी रात्रंदिवस एक केलाय. तरीही त्यांचं वैद्यकीय प्रवेशाचं भवितव्य अंधातरी आहे. आता सुप्रीम कोर्ट या प्रकरणात विद्यार्थ्यांना न्याय देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.