मेव्हण्याला वाचवण्यासाठी त्यानं बिबट्याचा केला सामना... पुढे काय घडलं जाणून घ्या

या मजुरांसोबत संदीप आणि त्याचा 20 वर्षीय मेव्हणा संजू देखील होता.

Updated: Jan 8, 2022, 03:45 PM IST
मेव्हण्याला वाचवण्यासाठी त्यानं बिबट्याचा केला सामना... पुढे काय घडलं जाणून घ्या title=

भोपाळ : मध्य प्रदेशातील पर्यटन स्थळ पचमढी येथे आपल्या मेव्हण्याला वाचवण्यासाठी या व्यक्तीने मृत्यूशी झुंज दिली. बिबट्या त्याच्या मेव्हण्याला ओढत नेत होता, पण भावाने तत्परता दाखवत त्याच्या जबड्यात धक्का मारून त्याला हाकलून दिले. या मारामारीत तरुणाच्या डोक्याला आणि नाकाला दुखापत झाली आहे. पचमढीजवळील नीमघन गावात ही घटना घडली. येथे या व्यक्तीचा मेव्हणा मंडपात झोपला असताना बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला.

या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळ गाठून जखमी तरुणाला रुग्णालयात नेले. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री 12.15 च्या सुमारास बिबट्याने त्यांच्या तंबूत घुसून हल्ला केला. प्रत्यक्षात पर्यटनस्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर कल्व्हर्टची दुरुस्ती केली जात आहे. येथे काम करणारे सुमारे 7 मजूर तंबुतच झोपले होते.

या मजुरांसोबत संदीप आणि त्याचा 20 वर्षीय मेव्हणा संजू देखील होता. रात्रीच्यावेळी बिबट्याने हळूच तंबूत प्रवेश केला आणि संजूला डोक्याला धरुन बिबट्या ओढू लागला. संजूने आरडाओरडा केल्यावर संदीपला जाग आली आणि त्याची लगेच बिबट्याशी झटापट झाली. संदीपने सांगितले की, संजू बिबट्याच्या जबड्यात अडकला होता, त्यामुळे त्याने जास्त विचार न करता बिबट्याच्या जबड्यावर मारण्यास सुरूवात केली. तो एका हाताने बिबट्याच्या जबड्यावर मारत राहिला आणि दुसऱ्या हाताने तो आपल्या मेहूण्याला ओढत होता.

ही लढत सुमारे 40 सेकंद चालली. यानंतर त्या बिबट्याने भक्ष्य सोडून तेथून पळ काढला. परंतु संजुला म्हणजेच संदिपच्या मेव्हण्याला दुखापत झाली. त्याच्या मानेवरती आणि बिबट्याच्या ओरखड्याचे निशाण आहे. त्याच्या नाकालाही गंभीर दुखापत झाली आहे. मात्र त्याची प्रकृती आता ठीक आहे.