तेज प्रताप यादव यांनी गायीला विचारले, 'भाजपला हरवशील'?

तेज प्रताप यादव यांचा नवा लूक 'रूद्र द अवतार' हा चित्रपटात पहायला मिळणार आहे. 

Updated: Jul 11, 2018, 11:17 AM IST
तेज प्रताप यादव यांनी गायीला विचारले, 'भाजपला हरवशील'?

हाजीपूर: राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेज प्रताप यादव सध्या आपल्या विधानसभा मतदारसंघात दौरा करत आहेत. या दौऱ्याच्या माध्यमातून ते पुन्हा एकदा लोकांशी संवाद साधू इच्छितात. लालू प्रसाद यादव यांच्याप्रमाणेच जनतेची नाडी पकडता यायला हवी यासाठी ते अनेक क्लृप्त्या करताना दिसत आहेत. यातूनच ते कधी रिक्षावर चढतात तर, कधी सार्वजनीत हापशावर (हँडपंप) आंघोळ करतात. दरम्यान, वृत्त आहे की, तेज प्रताप यांनी महुआच्या दौऱ्यावर असताना करहटिया गावात मशीनने चारा कापून गायीला खायला घातला आणि गायला विचारले 'सांग भाजपला हरवशील'?

'गाय म्हणाली भाजपला पराभूत करेन'

दरम्यान, तेजप्रताप यांच्या प्रश्नावर तो मुका जीव काय बोलणार? पण, चारा खाताना गायीने मान हालवली. यावर तेजप्रताप यांचे समर्थक म्हणाले, 'पाहा गाय होय मी भाजपला हरवेन असे म्हणत आहे'. तेज प्रताप यांनी नरेंद्र मोदी यांच्या 'चाय पे चर्चा'च्या धरतीवर 'टी विथ तेज प्रताप' सुरू केले होते. पुढे हाच उपक्रम बदलून तो 'सत्तू पार्टी तेज प्रताप के संग' असा परावर्तीत करण्यात आला. 

 'रूद्र द अवतार'मध्ये तेजप्रताप यांचा हटके लूक

दौऱ्यादरम्यान तेज प्रताप यांचे अनेक रंग पहायला मिळत आहेत. कधी ते सायकलवरू एका गावातून दुसऱ्या गावी जात आहेत. तर, कधी ते रस्त्यावर बसून लोकांसबत कादा, भाकरी खात आहेत. दरम्यान, तेज प्रताप यादव यांचा नवा लूक 'रूद्र द अवतार' हा चित्रपटात पहायला मिळणार आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी बॉडी कमाविण्यासाठी ते जिममध्ये चांगलीच मेहनत घेत आहेत. नुकतीच त्यांनी आपला फोटोही ट्विटरवर शेअर केला होता.