रेल्वे प्रवासात अडचणी आल्या तर कुठे आणि कशी कराल तक्रार, जाणून घ्या...

यासाठी तुमच्याकडे चार अगदी सहज सोपे पर्याय उपलब्ध आहेत...  

Updated: Aug 1, 2018, 09:20 AM IST
रेल्वे प्रवासात अडचणी आल्या तर कुठे आणि कशी कराल तक्रार, जाणून घ्या... title=

मुंबई : देशात प्रवासासाठी सुरक्षित प्रवासासाठी सर्वात प्रथम विचार केला जात असेल तर तो आहे रेल्वे प्रवास... परंतु, अनेकदा रेल्वे प्रवासात आपल्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. यावेळी अशा अडचणींची तक्रार नक्की दाखल कुठे आणि कशी करायची? आणि तक्रार दाखल केल्यानंतरही त्यावर विचार होईल किंवा नाही याची खात्री नसते. त्यामुळे अनेक जण तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ करतात. परंतु, यावरच उपाय म्हणून आणि रेल्वेचा कारभार सुधारण्यासाठी रेल्वेनं प्रवाशांसाठी काही सोपे पर्याय उपलब्ध करून दिलेत. ज्याद्वारे प्रवासी सहजगत्या आपल्याला आलेल्या अडचणींची तक्रार प्रशासनापर्यंत पोहचवू शकतील. तसंच या तक्रारींची वेळोवेळी दखलही घेण्यात येईल. 

स्टेशन, रेल्वेत अस्वच्छता, खाद्यपदार्थांची गुणवत्ता, नेहमीच होणारा उशीर, रेल्वेत आणि स्टेशनवर होणारी चोरी अशा प्रकारच्या रेल्वे प्रवासाशी निगडीत तक्रारी तुम्ही भारतीय रेल्वेकडे दाखल करू शकता. यासाठी तुमच्याकडे चार अगदी सहज सोपे पर्याय उपलब्ध आहेत...  

वेबसाईटवर तक्रार नोंदवा

यासाठी तुम्हाला  http://www.coms.indianrailways.gov.in/  या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन फॉर्म भरून आपली तक्रार नोंदवता येऊ शकेल. त्यानंतरदेखील तुमच्या तक्रारीवर काय कारवाई करण्यात आली त्याचं स्टेटसही तुम्ही याद्वारे ट्रॅक करू शकता. त्यासाठीही तुम्हाला ऑनलाईनच एक छोटा फॉर्म भरावा लागेल. 

कॉल / एसएमएसद्वारे नोंदवा तक्रार

प्रवासी कॉल करून किंवा एसएमएसद्वारेही आपली तक्रार नोंदवू शकतील. 

- तक्रार नोंदवण्यासाठी तुम्हाला १३८ या क्रमांकावर कॉल करावा लागेल.

- सुरक्षेसंबंधी एखादी तक्रार असल्यास तुम्ही १८२ या क्रमांकावरही कॉल करू शकाल. 

-  किंवा +919717680982 या क्रमांकावर एसएमएस करूनही तुम्ही आपली तक्रार नोंदवू शकता

ट्विटरद्वारे नोंदवा तक्रार

सोशल मीडियावरूनही नोंदवल्या गेलेल्या अनेक तक्रारींना भारतीय रेल्वेकडून त्वरीत प्रतिसाद मिळाल्याचं गेल्या काही घटनांतून दिसून आलंय. त्यामुळे तुम्ही  @RailMindia ला टॅग करूनही आपली तक्रार नोंदवू शकता. 

मोबाईल अॅपचा करा वापर 

सध्या प्रत्येकाच्या हाती मोबाईल दिसतो. आपल्या सुविधेसाठी भारतीय रेल्वेचं अॅप तुम्ही आपल्या अॅन्ड्रॉईड मोबाईलमध्ये डाऊनलोड केलं असेल तर या अॅपचा वापरही तुम्ही तक्रार नोंदवण्यासाठी करू शकाल. सोबतच काही सूचना किंवा फिडबॅक द्यायचा असल्यास ती सुविधादेखील अॅपवर उपलब्ध आहे. यामध्ये तुम्हाला एखादी अटॅचमेंटही पाठवण्याचा पर्याय उपलब्ध आहे.