आसन व्यवस्था का बदलली?, संजय राऊत यांचे सभापतींना पत्र

राज्यसभेतील जागा बदलल्याने शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहिले आहे.  

Updated: Nov 20, 2019, 03:59 PM IST
आसन व्यवस्था का बदलली?, संजय राऊत यांचे सभापतींना पत्र title=
संग्रहित छाया

नवी दिल्ली : राज्यसभेतील जागा बदलल्याने शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहिले आहे. राज्यसभेतील आसनव्यवस्था का बदलली, अशा आशयाचे पत्र नायडूंना लिहिले आहे. शिवसेनेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचे या पत्रात राऊतांनी म्हटले आहे. राज्यसभा सभागृहातील माझी बसण्याची व्यवस्था तिसऱ्या रांगेतून पाचव्या रांगेत करण्यात आली आहे, हे जाणून मी आश्चर्यचकित झालो आहे. शिवसेनेच्या भावना दुखविण्यासाठी आणि आमचा आवाज दाबण्यासाठी हा निर्णय घेतला असवा, असे त्यांनी म्हटले आहे

शिवसेना - भाजपमधील महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा वाद आता टोकाला पोहोचल्याने निवडणुकीनंतर युती तुटली. असे असताना दोन्ही पक्षातील तणाव अद्याप कायम दिसून येत आहे. भाजप - शिवसेनेतील तणाव कमी होताना दिसत नाही. संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु झाले आहे. त्याचवेळी एनडीएतून शिवसेना बाहेर पडली. त्यामुळे केंद्र सरकारमधील घटक पक्ष आता शिवसेना नसल्याने शिवसेनेला विरोधी बाकावर बसावे लागत आहे. त्यामुळे त्यांची आसन व्यवस्थाही बदलण्यात आली आहे. राज्यसभेतही खासदार संजय राऊत यांची आसन व्यवस्था बदल्याने राऊत नाराज झाले आहेत. त्यांनी याबाबत थेट राज्यसभा सभापती व्यंकया नायडू यांना लेखी पत्र लिहीले. ही आसन व्यवस्था का बदलण्यात आली, अशी विचारणा केली आहे. त्याचवेळी शिवसेनेचे खच्चीकरण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, शिवसेनेचे मुखपत्र 'सामना' दैनिकातून भाजपवर टीकास्त्र करण्यात आले होते. राष्ट्रीय लोकशाही आघाडीत आता शिवसेना नाही. त्यावरुन भाजपला शिवसेनेने टोकले होते. त्याचवेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याशी सूत जुळल्याने शिवसेनेला एनडीएतून बाहेर काढण्यात आले आहे, अशी घोषणा भाजपचे नेते प्रल्हाद जोशी केली होती. त्यावरुनही 'सामना'तून टीका करण्यात आली होती. त्यावेळी एनडीएच्या बाळंतपणाच्या वेदना शिवसेनेने अनुभवल्या आहेत. जेव्हा भाजपच्या वाऱ्यालाही कोणी उभे राहायला तयार नव्हते. हिंदुत्व आणि राष्ट्रवाद या शब्दांना देशाच्या राजकारणात अधिक महत्व नव्हते. त्यावेळी जनसंघाच्या पणतीत तेल घालण्याचे काम शिवसेनेने केले, असा टोला लगावला होता.