शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष Wasim Rizvi यांनी स्वीकारला हिंदू धर्म, नेमकं कारण काय?

वसिम रिझवी ऐवजी जितेंद्र नारायणसिंह त्यागी असं धारण केलंय. परंतु यानंतर सर्वत्र एकच चर्चा रंगली आहे की, हे असं का घडलं?

Updated: Dec 6, 2021, 08:04 PM IST
शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष Wasim Rizvi  यांनी स्वीकारला हिंदू धर्म, नेमकं कारण काय? title=

लखनऊ : उत्तर प्रदेशातील मुस्लीम धर्मियांचे नेते आणि शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसिम रिझवी यांनी हिंदू धर्म स्वीकारला आहे. सकाळी साडेदहा वाजता गाझियाबादच्या डासना देवी मंदिरात धार्मिक विधी करत त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला. यती नरसिंहानंद गिरी महाराज यांनी त्यांना हिंदू धर्माची दीक्षा दिली. आपण आपल्या इच्छेनं हिंदू धर्मात प्रवेश करत आहोत, हिंदू धर्मात प्रवेश ही माझी घरवापसी आहे असं रिझवींनी म्हंटलंय. ज्यानंतर वसिम यांनी आपलं नाव वसिम रिझवी ऐवजी जितेंद्र नारायणसिंह त्यागी असं धारण केलंय. परंतु यानंतर सर्वत्र एकच चर्चा रंगली आहे की, हे असं का घडलं?

कोण आहेत वसिम रिझवी ?
वसिम रिझवी हे उत्तर प्रदेशातल्या शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष आहेत. ते खऱ्या अर्थानं चर्चेत आले ते कुराणातील 26 आयातींना हटवण्याच्या मागणीवरून. मात्र सर्वोच्च न्यायालयानं त्यांची याचिका फेटाळून लावली होती. त्यानंतर त्यांनी मदरशांमध्ये समलैंगिक संबंध वाढतात,असा मोठा आरोपही केला होता.

इतकच नाही, तर उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून मदरशांवर बंदी घालण्याची मागणीही केली. अलिकडेच त्यांनी आपल्यावर हिंदू धर्मिंयाप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात यावे असं एकआपल्या मृत्यूपत्रात नमूद केलं होतं. त्यामुळेच त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला आहे.

इस्लाम धर्म त्यागल्यानंतर रिझवी म्हणाले, "इथं धर्म परिवर्तनाची कोणतीही बाब नाही. ज्यावेळी मला मुस्लिम धर्मातून काढलं त्यानंतर मी कोणता धर्म स्वीकारावा हा सर्वस्वी माझा निर्णय असेल. सनातन धर्म हा जगातील सर्वात पहिला धर्म आहे. या धर्मात असणाऱ्या अनेक चांगल्या गोष्टी इतर धर्मांमध्ये नाहीत."

पुढे रिझवी म्हणाले, "मी इस्लामला धर्म मानत नाही. प्रत्येक जुम्म्याला नमाज पठणानंतर आमचं शिर कलम करण्याचा फतवा काढला जातो. त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये आम्हाला कोणी मुस्लिम म्हणणं ही शरमेची बाब ठरते."

आपल्या या कडव्या भूमिकांमुळे आता वसीम रिझवी म्हणजे जितेंद्र कट्टरतावाद्यांच्या रडारवर आहेत. मुस्लीम मौलवी आणि त्यांच्यातला वाद सर्वांना ठाऊक आहे. हा वाद इतका टोकाला पोहचला होता की रिझवीचं डोकं जो कुणी छाटेल त्याला हजची ट्रीप मोफत दिली जाईल अशी घोषणा एका मुस्लीम संघटनेनं केली होती. या सगळ्याला उत्तर म्हणून वसिम रिझवी आता जितेंद्र त्यागी बनलेत. त्यांच्या धर्मांतरामुळे उत्तर प्रदेशचं राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालं आहे.