भगतसिंह, लोकमान्य टिळक, स्वामी विवेकानंद यांचे व्हीडिओ का होतायत व्हायरल?

काय असतं आर्टिफिशयल इंटिलिजन्स? 

Updated: Mar 4, 2021, 04:46 PM IST
भगतसिंह, लोकमान्य टिळक, स्वामी विवेकानंद यांचे व्हीडिओ का होतायत व्हायरल?

भगतसिंह, लोकमान्य टिळक, स्वामी विवेकानंद यांचे आतापर्यंत तुम्ही फोटोज पाहिले असतील, जिवंतपणी त्यांना ज्यांनी पाहिलं असेल ते आता हयातही नसतील. पण गेल्या २-४ दिवसांपासून सोशल मीडियावर भगतसिंह, टिळक, स्वामी विवेकानंद यांचे व्हीडिओज व्हायरल होतायत. पण हे व्हीडिओज काही कुणी वर्षानुवर्षे त्यांच्याकडे जपून ठेवलेले आणि आता बाहेर काढलेत, असं नाहीये. तर ही किमया आहे आर्टिफिशल इंटेलिजन्सची.

किर्थिक ससीधरन या ट्विटर यूजरने हे व्हीडिओज तयार केले. एक फोटो घेऊन आर्टिफिशल इंटेलिजन्सचे अल्गोरिदम किंवा टूल्स वापरून त्या व्यक्तीचे हावभाव दाखवता येतात. अशाचप्रकारे त्याने भगतसिंह, लोकमान्य टिळक, स्वामी विवेकानंद, मुंशी प्रेमचंद, कस्तुरबा गांधी, ऑरोबिंदो यांचे व्हीडिओ बनवले आहेत.

 

 

माय हेरिटेज अॅपवर असलेले डीप नॉस्टॅलजिक फिचर वापरून अशा प्रकारचे व्हीडिओज सहज बनवता येतात. आयओएस आणि अँड्रॉईड अशा दोन्ही सिस्टिमवर हे अप उपलब्ध आहेत. हे अप उघडल्यावर तुम्हाला तुमची बेसिक माहिती जसं की इमेल आयडी, नाव यांसारख्या गोष्टी भराव्या लागतात, त्यानंतर फोटोजचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि तुम्हाला हवा तो फोटो अपलोड करायचा. फोटो अपलोड झाल्यावर अनिमेशनचा आयकॉन सिलेक्ट करून तुम्ही त्या फोटोमध्ये अनिमेशन करू शकता.

केवळ अनिमेशनच नाही, तर या माय हेरिटेज अपचा विविध गोष्टींसाठी वापर करता येतो. जसं की फॅमिली ट्री. काही कुटुंबं इतकी मोठी असतात, की त्यांना त्यांचे पूर्वज आठवायला हातावरची बोटंही कमी पडतील. बॉलिवूडमधलं सध्याचं कपूर कुटुंब, राजकारणातलं उत्तर प्रदेशातील यादव कुटुंब. ही कुटुंब इतकी मोठी आणि आणि त्यांच्या कुटुंबातील बहुतांश सदस्य त्या क्षेत्रात उतरल्यामुळे कोण कुणाचा कोण लागतो, हे लक्षात ठेवणं कठीणच. अशावेळी फॅमिली ट्री या अपवर तयार करून ठेवता येऊ शकते. याशिवाय डीएनए अनालिसिस, मॅचिंग डीएनएचे रिपोर्ट याही गोष्टी माय हेरिटेज अप वापरून करता येऊ शकतात.

अर्थात यातील काही गोष्टी या मोफत आहेत, तर काहींसाठी तुम्हाला पैसेही मोजावे लागू शकतात.

आता आणखी एक प्रश्न म्हणजे आर्टिफिशल इंटिलिजन्स काय? साध्या सोप्या भाषेत सांगायचं तर माणूस हा सजीव आहे, त्यांना मेंदू आहे, त्यामुळे त्यांच्याकडे सद्सद्विवेकबुद्धी असते. पण अशी बुद्धी यंत्र, मशीन्सना नसते. त्यांना आपण सेट केलेल्या गोष्टींनुसारच मशीन्स चालतात. पण जेव्हा मशीन्सही अशाप्रकारची बौद्धीक कामं करायला लागतात, त्याला आर्टिफिशल इंटिलिजन्स म्हणता येऊ शकतं.

हल्ली सोशल मीडियावर एक गोष्ट आली, व्हायरल झाली की त्याला धुमारे फुटतात. सध्या जे भगतसिंह, स्वामी आणि टिळकांचे व्हीडिओ व्हायरल होतायत, तसंच काही यूजर्सनी अशा आणखी ऐतिहासिक व्यक्तिमत्वांचे व्हीडिओ तयार केले.

अँड्री फ्रॉलॉन या ट्विटर यूजरने मोनालिसाचा आर्टिफिशयल इंटिलिजन्सच्या माध्यमाने व्हीडिओ तयार केला.

 

याशिवाय अमित कोटेचा याही यूजरने अमेरिकन इंन्वेटर निकॉन टेस्लाचा व्हीडिओ तयार केलाय, ज्यात त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्यही आहे.

या तंत्रज्ञानाचा वापर करून तुम्ही कोणत्याही फोटोमधील व्यक्तीच्या चेहऱ्यावर हास्य आणू शकता, त्यांचे डोळे मिचकवताना दाखवू शकता, किंवा ती व्यक्ती इथे-तिथे बघते असंही दाखवू शकता, जसं की आपण मगाचपासून दाखवलेल्या व्हीडिओमध्येही पाहू शकतो.

पण अशाप्रकारे आर्टिफिशल इंटिलिजन्स वापरून व्हीडिओ तयार करण्याचा हा काही पहिला प्रयोग नाही. याआधीही तुम्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा एका गाण्यावर मान डोलवताना आणि ते गाणं गातानाचा फेक व्हीडिओ तयार करण्यात आलेला, तोही अशाचप्रकारच्या टेक्निकने तयार केलेला आहे.

जगात काहीही अशक्य नाही, नथिंग इज इम्पॉसिबल असं म्हटलं जातं. २१ व्या शतकात येणारी अशाप्रकारची टेक्नॉलॉजी कदाचित हीच गोष्टी खरी ठरवतायत. पण जितकं जास्त आपण सोशल मीडिया आणि वेगवेगळी तंत्रज्ञान वापरतो, तितकंच आपण सावध राहण्याचीही गरज आहे. जर अशाप्रकारे कोणत्याही फोटोसोबत छेडछाड करता येऊ शकत असेल, तर आपण अशा माध्यमांवर किंवा अप्सवरही स्वत:चे फोटो टाकणं टाळलं पाहिजे, जेणेकरून तुमच्या फोटोचा कुणी चुकीचा वापर करणार नाही.