लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात पक्षांतराचे राजकारण सुरु झाले आहे. प्रत्येक पक्ष आपली छावणी मजबूत करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. अशा परिस्थितीत नेतेही स्वत:साठी चांगल्या संधी शोधत आहेत.
योगी सरकारमधील कॅबिनेट मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मौर्य यांनी समाजवादी पक्षात प्रवेश करत भाजपला धक्का दिला आहे. या धक्क्यातून सावरत नाही तोच भाजपाला आणखी धक्के बसले आहेत. भाजपला सोड चिट्ठी देत आतापर्यंत २० जणांनी सपामध्ये प्रवेश केला आहे. त्यात मौर्य हे मोठे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मौर्य यांच्यानंतर आणखी २ मंत्री आणि सुमारे १० भाजप आमदार लवकरच सपामध्ये सामील होणार आहेत. त्या नाराजांचे मन वळविण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू आहेत. या कामाची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
मौर्य यांच्यासोबत भाजप आमदार ब्रिजेश प्रजापती आणि तिल्हारचे शाहजहांपूरचे आमदार रोशलाल यांनीही सत्ताधारी भाजप पक्ष सोडला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपावरून भाजपमध्ये मंथन सुरू आहे, मात्र यादरम्यान एकापाठोपाठ एक पक्षाचे नेते निघून गेल्याने हा चिंतेचा विषय बनला आहे.
आतापर्यंत जे २० नेते भाजप सोडून सपामध्ये गेले आहेत त्यावर एक नजर
१. कॅबिनेट मंत्री स्वामी प्रसाद मौर्य
२. आमदार राकेश राठोड ( सीतापूर )
३. आमदार जय चौबे ( संत कबीरनगर )
४. आमदार माधुरी वर्मा ( नानपारा, बहराइच )
५. आमदार आर. के शर्मा ( बिलसी, बदाऊन )
६. माजी खासदार रमाकांत यादव ( आझमगड )
७. माजी मंत्री राकेश त्यागी ( बुलंद शहर )
८. माजी आमदार श्रीराम भारती ( मिर्झापूर )
९. माजी आमदार इंदरपाल ( औरेया )
१०. शिवशंकर सिंग पटेल ( बुंदेलखंड )
११. हेमंत निषाद ( आग्रा )
१२. ब्रिजेश गौतम ( अलीगढ )
१३. दीपक विग ( नोएडा )
१४. अरविंद गुप्ता ( फारुखाबाद )
१५. कृपाशंकर पटेल ( भगवंतनगर, उन्नाव )
१६. राहुल लोधी ( रायबरेली )
१७. एच. एन. पटेल ( मौ )
१८. त्र्यंबक पथक ( बस्ती )
१९. हरिओम उपाध्याय ( बुंदेलखंड )
२०. उत्तम चंद्र राकेश ( उत्तर प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय लोधी महासभा )
यांनी केला भाजपमध्ये प्रवेश
भाजपला एकटे सोडणाऱ्या नेत्यांची यादी मोठी असली तरी अलीकडे अनेक बड्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यात सर्वात मोठे नाव माजी केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद यांचे आहे.
१. जितिन प्रसाद ( काँग्रेस - शाहजहांपूर )
२. आदिती सिंह ( आमदार काँग्रेस - रायबरेली )
३. वंदना सिंह ( आमदार बसपा - आझमगड )
४. सुभाष पासी ( आमदार एसपी - गाझीपूर )
५. शत्रुध प्रकाश ( एमएलसी सपा )
६. नरेंद्र भाटी ( एमएलसी सपा - नोएडा )
७. पप्पू सिंग ( एमएलसी सपा - बलिया )
८. सीपी चंद ( एमएलसी सपा - गोरखपूर )
९. रामा निरंजन ( एमएलसी सपा - ललितपूर )
१०. अजित बल्यान ( बसपा - अलीगढ )
विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रत्येक पक्ष आपला छावणी मजबूत करण्याचा प्रयत्न करत असते. अशा स्थितीत स्वत:साठी योग्य जागा आणि संधीच्या शोधात असणारे नेतेही पक्षांतर करू लागले आहेत. पण शेवटी कोणती छावणी बाजी मारणार, हे येत्या 10 मार्चला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून कळेल.