आम्ही राहुल गांधींना काश्मीरमध्ये नेण्याची व्यवस्था करू- संजय राऊत

राहुल गांधी यांना फिरण्यासाठी आणि मौजमजेसाठी काश्मीरमध्ये जायचे असेल तर आम्ही पर्यटन विभागाला तशी विनंती करू.

Updated: Aug 25, 2019, 03:38 PM IST
आम्ही राहुल गांधींना काश्मीरमध्ये नेण्याची व्यवस्था करू- संजय राऊत title=

नवी दिल्ली: राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्यांना काश्मीरमध्ये मजा करायला जायचे असेल तर आम्ही त्याची व्यवस्था करू, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. त्यांनी रविवारी एएनआय वृत्तसंस्थेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधताना म्हटले की, राहुल गांधी यांना फिरण्यासाठी आणि मौजमजेसाठी काश्मीरमध्ये जायचे असेल तर आम्ही पर्यटन विभागाला तशी विनंती करू. जेणेकरून त्यांची योग्य ती व्यवस्था होईल, असा टोला संजय राऊत यांनी हाणला. 
 
 राहुल गांधी आणि काँग्रेसचे नेते शनिवारी काश्मीरमध्ये जाण्यासाठी श्रीनगर विमानतळापर्यंत पोहोचले होते. मात्र, त्यांना विमानतळावरूनच परत पाठवण्यात आले. यामुळे केंद्र सरकार काश्मीरमधील खरी परिस्थिती लपवत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला होता. 
 
 मात्र, संजय राऊत यांनी सरकारच्या या निर्णयाचे समर्थन केले आहे. राहुल गांधी काश्मीरमध्ये गेल्यास धोका उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना विमानतळावरून परत पाठवण्याचा सरकारचा निर्णय योग्य होता, असे राऊत यांनी म्हटले. 
 
 यावेळी राऊत यांनी काश्मीरमधील अनुच्छेद ३७० रद्द करण्यात आल्याच्या मुद्द्यावरही भाष्य केले. अनुच्छेद ३७० रद्द झाल्याने कोणाची स्वप्ने पूर्ण होणार, हे मला माहिती नाही. मात्र, संपूर्ण देशाला ही गोष्ट व्हायला पाहिजे, असे वाटत होते. त्यामुळे मी हा निर्णय घेतल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांचे आभार मानतो, असेही राऊत यांनी म्हटले. 
 
 दरम्यान, केंद्र सरकारने काश्मीरमधील निर्बंध अजूनही पूर्णपणे उठवलेले नाहीत. मात्र, काश्मीरमध्ये जीवनावश्यक वस्तू आणि औषधांची कमतरता नाही. याउलट प्रशासनाकडूनच ईदच्या दिवशी भाज्या, अंडी स्थानिकांच्या घरापर्यंत पोहोचवण्यात आली होती. येत्या १० ते १५ दिवसांत तुमचे मत नक्की बदलेल, असे जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी सांगितले.