Viral Video : भारतामधील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले केदारनाथ (Kedarnath) मंदिर सध्या गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. केदारनाथ मंदिरात सोन्याच्या जागी पितळ लावल्याचा आरोर पुजाऱ्यांनी केला आहे. दुसरीकडे मंदिर परिसर, प्रशासनाची प्रतिमा मलीन करण्याच्या हेतून ही चुकीची माहिती पसरवली जात असल्याची प्रतिक्रिया मंदिर प्रशासन समितीनं दिली आहे. यानंतर मंदिरातील काही व्हिडीओ देखील व्हायरल (Viral Video) झाले आहेत. अशातच आता आणखी एक नवं प्रकरण समोर आले आहे. केदारनाथ मंदिरात (Kedarnath Temple) एक महिला चक्क नोटा उडवत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
केदारनाथमध्ये भाविकांच्या श्रद्धेसोबत खेळ होत असल्याची घटना समोर आली आहे. केदारनाथ मंदिराच्या गर्भगृहात एका महिलेने नोटा फेकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे (बीकेटीसी) अध्यक्ष अजेंद्र अजय यांनी सोमवारी अधिकाऱ्यांना यासंदर्भात चौकशी करण्याचे आदेश दिले. गर्भगृहात पुजाऱ्यांच्या उपस्थितीत घडलेल्या या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त करत बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीने अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागितले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, महिलेला असे करण्यापासून रोखत नसल्याबद्दल पुजाऱ्यांवरही टीकाही करण्यात येत आहेत. केदारनाथ मंदिराच्या शिवलिंगाशेजारीच हा सर्व प्रकार शूट केला गेला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मंदिरात फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफीला बंदी असतानाही हा सर्व प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. पांढऱ्या साडीतील एका महिलेने नोटा हवेत देखील फेकल्या आहेत.
महादेव को पैसे से पसंद कर रही है ये तो बेलपत्र से भी पसंद हो जाते है#Kedarnath #Mahadev pic.twitter.com/ipTyjGGflD
— Gaurav Verma (@Garv_verma7) June 19, 2023
यासोबतच बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीने या प्रकरणाची चौकशी करून तातडीने कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. बीकेटीसीचे अध्यक्ष अजेंद्र अजय यांनीही या संदर्भात रुद्रप्रयाग जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांशी याबाबत चर्चा केली आहे. तसेच दोषींवर तात्काळ कारवाई करण्यास सांगितले आहे. सोशल मीडियावरही या व्हिडिओवर तीव्र प्रतिक्रिया आल्या आहेत.