महिला कॉन्स्टेबलने गँगस्टरशीच बांधली लग्नगाठ

पाहा कुठे घडली ही घटना 

Updated: Aug 11, 2019, 07:53 AM IST
महिला कॉन्स्टेबलने गँगस्टरशीच बांधली लग्नगाठ
संग्रहित छायाचित्र

मुंबई : लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात, असं म्हटलं जातं. पूर्वापार चालत आलेल्या या विधानावर असंख्यजणांचा विश्वासही आहे. पण, याच विश्वासाचं एक वेगळं रुप पाहायला मिळालं सध्या चर्चेत असणाऱ्या एका अनोख्या लग्नामध्ये. एका लग्नाची आगळीवेगळी गोष्ट सध्या अनेकांचंच लक्ष वेधत आहे. अर्थात त्यामागची कारणंही तशीच आहेत. 

हे लग्न काही साधंसुधं लग्न नाही. तर, हे लग्न आहे, पोलीस आणि गुन्हेगाराचं. बसला ना तुम्हालाही धक्का? सुरुवातीला यावर तुमचा विश्वास बसणार नाही, पण ही बाब खरी आहे. 'टाईम्स ऑफ इंडिया'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार एका स्थानिक न्यायालयाच्या आवारात या प्रेमकहाणीला बहर आला आणि कालांतराने पोलीस कॉन्स्टेबल पायलने गँगस्टर राहुल थासरानाशी Rahul Thasrana लग्नगाठ बांधली.  

३० वर्षीय राहुलला ९ मे २०१४ रोजी मनमोहन गोयल या व्यायसायिकाच्या हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्याच्या नावे दरोडा, हत्या असे अनेक गुन्हेही नोंदवण्यात आले आहेत. अशा या राहुलची कॉन्स्टेबल पायलशी गाठ पडली ती म्हणजे सुरजपूर न्यायालयामध्ये. कारागृहात राहुलचा वावर असतानाही आणि त्याच्यावर इतके आरोप असतानाही पायल त्याच्या संपर्कात होती यादरम्यानच त्याचं नातं आणखी खुललं. 

सोशल मीडियावर खुद्द राहुलने त्याच्या मित्रांशी शेअर केलेले फोटो आता व्हायरल होत असून, अनेकांनाच थक्क करत आहेत. त्यांचं लग्न कोणत्या ठिकाणी झालं, यावरुन पडदा उचलला गेलेला नाही. दरम्यान, लग्नाच्या क्षणापर्यंत गौतम नगर पोलीस स्थानकामध्ये सेवेत रुजू असणाऱ्या पायलच्या सध्याच्या बदलीविषयी तेथील पोलीस अधिकाऱ्यांना काहीही माहिती नसल्याची बाब समोर येत आहे. 

(ग्रामीण) पोलीस महासंचालक रणविजय सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या यादीतून तिच्या नावाची पडताळणी सुरु आहे. शिवाय पोलीस खातं तिच्याविरोधात रितसर कारवाई करण्याच्या विचारात असल्याचंही स्पष्ट होत आहे. 

कोण आहे हा गँगस्टर राहुल ? 

अनिल दुजाना गँगशी राहुल संपर्कात होता. २००८ मध्ये त्याने गुन्हेगारी विश्वात पाऊल ठेवलं होतं, अशी माहिती नोएडा युनिटमधील वरिष्ठ पोलीस अधिकारी राजकुमार मिश्रा यांनी दिली.  

गोयल हत्येसंबंधीच्या गुन्ह्याची शिक्षा भोगल्यानंतर २०१६ मध्ये तो कारागृहातून बाहेर आला आणि त्याने पुन्हा एकदा गुन्हेजगताची वाट धरली होती. ग्राम प्रधान या पदासाठी उभ्या असणाऱ्या आपल्य़ा आईविरोधात कोणी गेल्यास त्यांना याच्या वाईट परिणामांचा सामना करावा लागेल अशी धमकीही त्याने गावकऱ्यांना दिली होती, हा खुलासाही मिश्रा यांनी केला. 

२०१७ मध्ये राहुलला पुन्हा बेड्या ठोकण्य़ात आल्या. ज्यानंतर कारागृहातून सुटका झाल्यावर त्याने पायलशी विवाह केला. त्याच्या गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पायल दर, तीन- चार दिवसांआड गावात येत होती. दरम्यान, स्थानिक निवडणुकांपासून राहुलचा कुठेही थांगपत्ता नाही.