Viral Video: बसमध्ये सीट मिळवण्यासाठी अनेकदा फार कष्ट घ्यावे लागतात. गर्दी होणाऱ्या बसमध्ये तर सर्वात आधी आत घुसण्यासाठी स्पर्धा सुरु असते. त्यातही काही पठ्ठे तर थेट खिडकीतून प्रवास करण्याचा प्रयत्न करत असतात. पण यात काही असेही असतात जे बाहेरुनच सीटवर रुमाल टाकतात आणि आता ती आपली आहे असं जाहीर करुन टाकतात. आपल्याकडे भारतात तर अनेक ठिकाणी सर्रासपणे ही दिव्य कामगिरी करणारे आढळतात. नंतर मग यातून वादही होतात. असाच वाद कर्नाटकच्या (Karnataka) म्हैसूरमध्ये (Mysore) झाला असून त्याचा व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल झाला आहे.
म्हैसूर येथे सीटवरुन दोन महिलांमध्ये झालेल्या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. म्हैसूर सिटी बस टर्मिनल येथे बसच्या सीटवरुन आधी दोन महिलांमध्ये शाब्दिक वाद झाला. नंतर या वादाचं रुपांतर थेट हाणामारीत झालं.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत दिसत आहे त्याप्रमाणे, आधी दोन्ही महिलांमध्ये शाब्दिक वाद सुरु होतो. नंतर काही वेळातच त्याचं रुपांतर हाणामारीत होतं. दोन्ही महिला सीटवर दावा करत भांडत होत्या. चामुंडी हिल्सला जाणाऱ्या बसमध्ये हा प्रकार घडला.
Fights erupting in Mysore, Karnataka’s free bus service scheme. pic.twitter.com/4ugFTuK039
— Tathvam-asi (@ssaratht) June 20, 2023
मिळालेल्या माहितीनुसार, एका महिलेने दुपट्टा टाकून जागा अडवली होती. यानंतर दुसऱ्या महिलेने हा दुपट्टा हटवला आणि सीटचा ताबा घेतला. यानंतर दुपट्टा टाकणाऱ्या महिलेने त्या महिलेला सीटवरुन उठण्यास सांगितलं. जेव्हा महिलेने नकार दिला तेव्हा दोघींमध्ये वाद सुरु झाला. यानंतर तर थेट धक्काबुक्की करत मारहाणीला सुरुवात झाली.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने सत्तेत आल्यास महिलांसाठी मोफत बससेवा सुरु करण्याची घोषणा केली होती. काँग्रेसला या घोषणेचा फायदा झाला आणि पक्षाला निवडणुकीत विजय मिळाला.
निवडणूक जिंकल्यानंतर सिद्धरमय्या यांनी ही योजना लागू करण्याचं जाहीर केलं होतं. यानंतर शक्ती योजनेअंतर्गत 11 जूनला सर्व महिलांसाठी मोफत बससेवा सुरु करण्यात आली. या योजनेंतर्गत महिला राज्यात कुठेही प्रवास करु शकतात. एसी बस वगळता महिला कोणत्याही बसमधून प्रवास करु शकतात.
मोफत प्रवास करण्यासाठी महिलांकडे ओळखपत्र असणं अनिवार्य आहे. फोटो आणि पत्ता असणारं ओळखपत्र दाखवलं तरच महिलांना मोफत प्रवासाची सुविधा मिळणार आहे. महिलांना सेवा सिंधू पोर्टलच्या मदतीने पास तयार करण्यासाठी अर्ज देण्याची सुविधाही देण्यात आली आहे.