Priyanka Gandhi Protest : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलनासाठी बसलेल्या कुस्तीपटूंची काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी भेट घेतली. तसेच त्यांच्यासोबत चर्चाही केली. यावेळी महिला कुस्तीपटूंना भावना अनावर झाल्याने प्रियंका यांनी मायेने त्यांच्या डोक्यावरुन हात फिरवत त्यांना धीर दिला. जंतरमंतरवर बसलेल्या कुस्तीपटूंच्या धरणे आंदोलनाचा सातवा दिवस आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्याविरोधात कुस्तीपटू आंदोलनासाठी बसले आहेत. बृजभूषण यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहे. यावेळी प्रियंका यांनी बृजभूषण सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
आज सकाळी प्रियंका गांधी दिल्लीच्या जंतरमंतरवर पोहोचल्या. प्रियांका गांधी या ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात कुस्तीपटूंसोबत धरणे आंदोलनात सहभागी झाल्यात. मला पंतप्रधानांकडून कोणतीही अपेक्षा नाही, कारण जर त्यांना या कुस्तीपटूंबद्दल काळजी वाटत असेल, तर त्यांनी त्यांच्याशी अद्याप चर्चा का केली नाही किंवा त्यांना भेटले नाही. सरकार त्यांना वाचवण्याचा प्रयत्न का करत आहे, असा आरोप प्रियंका यांनी यावेळी केला.
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांना अटक होण्याची शक्यता
कुस्तीपटूंनी आधीच स्पष्ट केले होते की, आम्ही कोणाला अडवणार नाही. या लढ्यात ज्याला आम्हाला साथ द्यायची असेल ते आम्हाला मदत करु शकतात. दिल्लीच्या जंतरमंतरवर कुस्तीपटूंचे आंदोलन सातव्या दिवशीही सुरु आहे. प्रियंका गांधी यांनी कुस्तीपटूंशी संवाद साधला. काँग्रेस नेते दीपेंद्र हुड्डाही या आंदोलनात सहभागी झाले होते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही आज जंतरमंतरवर पोहोचणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
कुस्तीपटूंच्या भेटीनंतर प्रियका गांधी कर्नाटकमध्ये निवडणूक प्रचार कार्यक्रमात भाग घेणार आहेत. त्याआधी त्यांनी सकाळी जंतरमंतर गाठले आणि कुस्तीपटूंशी संवाद साधला. साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांच्याशी त्यांनी चर्चा केली. या आठवड्याच्या सुरुवातीला, प्रियंका गांधी यांनी विरोध करणाऱ्या कुस्तीपटूंना पाठिंबा दर्शवला होता आणि सरकारला या प्रकरणातील दोषींना वाचवायचे आहे का, असा सवाल विचारला होता. देशाचा सन्मान वाढवणाऱ्या खेळाडूंच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे आणि "जेव्हा एखाद्या पक्षाचा आणि नेत्यांचा अहंकार वाढतो तेव्हा, असे आंदोलन चिरडले जाते.
#WATCH | "I don't have any expectations from the PM, because if he is worried about these wrestlers, then why has he not talked to them or met them yet. Why the govt is trying to save him (Brij Bhushan Sharan Singh...," says Congress leader Priyanka Gandhi Vadra in Delhi pic.twitter.com/XLDpIruQHv
— ANI (@ANI) April 29, 2023
भूपिंदर हुड्डा, दीपेंद्र हुडा आणि उदित राज यांसारखे काँग्रेस नेतेही या आठवड्याच्या सुरुवातीला जंतरमंतर येथे विरोध करणाऱ्या कुस्तीपटूं पाठिंबा देण्यासाठी आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलक कुस्तीपटूंना पाठिंबा मिळत असताना, दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध सात महिला कुस्तीपटूंनी लावलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांवरुन दोन एफआयआर दाखल केले.
दिल्ली पोलिसांचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा यांचा समावेश असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाला शुक्रवारी गुन्हा दाखल केला जाईल असे सांगितल्यानंतर काही तासांनी प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आला. पहिला एफआयआर अल्पवयीन कुस्तीपटूच्या आरोपांशी संबंधित आहे आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पीओसीएसओ) कायद्यांतर्गत नोंदवण्यात आली होती, तर दुसरा विनयशीलतेशी संबंधित होता.