बंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी बहुमत चाचणीपूर्वी राजीनामा देणार असल्याची बातमी आली असली, तरी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि येडियुरप्पा यांच्यात चर्चा सुरू आहे. यानंतर येडियुरप्पा यांनी आपलं राजीनामा पत्र तयार करण्यास सुरूवात केली आहे. ही भाजपासाठी सर्वात धक्कादायक बातमी आहे, शेवटपर्यंत काँग्रेस आणि जेडीएसने आपले आमदार भाजपाच्या गळ्याला लागू दिले नाहीत हे यावरून स्पष्ट होत आहे. यामुळे बहुमत चाचणीपूर्वीच येडियुरप्पा राजीनामा देणार असल्याच्या शक्यतेला बळ येत आहे. तरीही भाजपाने शेवटपर्यंत आपल्याकडे ११२ आमदार असल्याचा दावा केला होता, काँग्रेसचे गायब आमदार प्रतापगौडा पाटील परतले असले तरी ते भाजपाच्या नाही तर, त्यांच्याच पक्षाच्या काँग्रेसच्या गोटात परतले आहेत.
१)येडियुरप्पा यांची अमित शहा यांच्याशी चर्चा, चर्चेनंतर येडियुरप्पा यांच्याकडून राजीनामापत्र बनवण्यास सुरूवात
२) बहुमत चाचणी होण्यापूर्वी येडियुरप्पा भाषण करतील आणि आपला राजीनामा सोपवतील असं म्हटलं जात आहे. यासाठी येडियुरप्पा यांनी १३ पानी भाषण तयार केल्याचं सांगितलं जात आहे.
३) दुसरीकडे काँग्रेसचे ते 1 आमदार अजूनही गायब आहे. यापैकी प्रतापगौडा पाटील परतले आहेत, पण त्यांनी येडियुरप्पा यांच्याकडे जाणे टाळले, यामुळे अजूनही विरोधीपक्ष आपली तटबंदी सांभाळून आहे. भाजपाला बहुमत सिद्ध करण्यासाठी ६ आमदारांची अजूनही गरज आहे. दुसरीकडे काँग्रेस-जेडीएसमधील काही आमदार येडियुरप्पा यांना मतदान करू शकतात, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.
४) कर्नाटक विधानसभेत सकाळपासून आतापर्यंत २०० आमदारांचा शपथविधी पूर्ण झाला आहे, आणि दुसरीकडे कोर्टाने दिलेल्या मुदतीची दुपारी ४ ची वेळ जवळ येत आहे.
५) येडियुरप्पा यांनी काँग्रेस आमदाराला मंत्रीपद आणि १५ कोटी रूपयांची ऑफर दिल्याची ऑडीओ क्लीप असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.