लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे निष्काळजीपणे काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांप्रती कडक पाऊले उचलत आहेत. यावेळी पुन्हा एकदा त्यांनी फर्मान जारी केल्याने कामात टाळाटाळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. सरकारी कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी सकाळी 9 वाजता कार्यालयात पोहोचायलाच हवे असे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व अधिकाऱ्यांनी तात्काळ या नियमाचे पालन करावे असे निर्देश देण्यात आले आहेत. असे न केल्यास त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यांचा पगार देखील कापण्यात येणार आहे. यासंदर्भातील माहिती मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून देण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री योगी हे एक्शन मोडमध्ये आहेत. नुकतीच त्यांनी काही अधिकाऱ्यांसोबत मिटींग घेतली. यामध्ये डीएम, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, पोलीस विभागासहित अनेक विभागातील अधिकाऱ्यांसोबत त्यांनी महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली.
भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधातही योगी आदित्यनाथ आक्रमक दिसले. भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे सरकारमध्ये काहीच काम नाही. अशा अधिकाऱ्यांविरोधात कारवाई व्हायला हवी आणि त्यांना जबरदस्ती सेवा निवृत्ती द्यायला हवी. भ्रष्ट अधिकाऱ्यांची यादी बनवून त्यांना स्वैच्छिक सेवानिवृत्ती घेण्यासाठी बांधिल करावे असा सल्लाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. ई-कार्यालय प्रणालीमध्ये गती आणण्याची आवश्यकताही त्यांनी यावेळी व्यक्त केली. पदोन्नती, पदं भरणे आणि कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती अशा मुद्द्यांवर योग्य ती कार्यवाही केली जाईल असे ते म्हणाले.