१९८४ च्या दंगलीसाठी राहुल गांधींना जबाबदार धरू नका - पी. चिंदबरम

'तेव्हा ते १३ - १४ वर्षांचे होते... त्यांनी कुणालाही दोषमुक्त केलेलं  नाही'

Updated: Aug 25, 2018, 04:53 PM IST
१९८४ च्या दंगलीसाठी राहुल गांधींना जबाबदार धरू नका - पी. चिंदबरम  title=

नवी दिल्ली : काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी शनिवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडून चर्चेत आणलेल्या राफेल डीलच्या मुद्यावर त्यांचा बचाव केला. 'मला वाटतं की राफेल मुद्दा खरोखरच इतका गंभीर आहे की यावर सार्वजनिक चर्चा होऊ शकते... याची सखोल चौकशी व्हायला हवी. त्यामुळेच काँग्रेस अध्यक्ष आणि पक्षाकडून हा मुद्दा उचलला जातो'

चिदंबरम यांनी १९८४ मध्ये झालेल्या शिख दंगलीसाठी काँग्रेस आणि राहुल गांधी यांना जबाबदार धरण्याच्या मुद्द्यावरही स्पष्टीकरण दिलंय. '१९८४ मध्ये काँग्रेसचं सरकार होतं. त्या वर्षी अनेक क्रूर घटना घडल्या होत्या. ज्यासाठी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनीही संसदेत खेद व्यक्त केला होता... परंतु, १९८४ च्या दंगलीसाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना जबाबदार धरलं जाऊ शकत नाही. तेव्हा ते १३ - १४ वर्षांचे होते... त्यांनी कुणालाही दोषमुक्त केलेलं  नाही'

अधिक वाचा - १९८४ च्या शीख दंगलीच्या मुद्द्यावरून राहुल गांधी वादात

राहुल गांधींनी काँग्रेसचा 'सहभाग' फेटाळला 

ब्रिटनच्या 'हाऊस ऑफ कॉमन्स' परिसरात शुक्रवारी झालेल्या 'भारत आणि विश्व' नावाच्या एका परिचर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी केलेल्या १९८४ च्या शीख दंगलीसंबंधी केलेल्या एका वक्तव्यावरून ते वादात सापडले आहेत. १९८४ साली शिखविरोधी उसळलेल्या दंगलीत काँगेस पक्षाचा 'हात' असल्याबद्दल विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी यांनी ही 'दुर्घटना' आणि 'त्रासदायक अनुभव' असल्याचं सांगितलं... परंतु, यामध्ये काँग्रेसचा सहभाग असल्याचं मात्र त्यांनी फेटाळून लावलं... माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच एका शीख अंगरक्षकाकडून हत्या झाल्यानंतर १९८४ मध्ये उसळलेल्या दंगलीत ३००० शिख ठार झाले होते. त्यावेळी केंद्रात काँग्रेसचं सरकार होतं. यावरून त्यांच्यावर जोरदार टीका होतेय. 

'मी त्या लोकांना मरताना पाहिलंय ज्यांच्यावर मी खूप प्रेम करत होतो. मी त्या व्यक्तीलाही मरताना पाहिलंय ज्यानं माझ्या वडिलांची हत्या केली होती (प्रभाकरण)... जेव्हा मी जाफनाच्या (श्रीलंका) तटावर प्रभाकरनला मृत पाहिलं तेव्हाही मला दु:ख झालं. कारण मी त्याला माझ्या पित्याच्या जागी पाहत होतो आणि त्याच्या मुलांच्या जागी स्वत:ला... त्यामुळे जेव्हा तुम्ही स्वत: हिंसा पीडित असता तेव्हा तुम्हाला त्याची झळ पोहचलेली असते... त्याचा परिणाम तुमच्यावर दिसतो' असंही यावेळी त्यांनी म्हटलं होतं.