सध्याच्या जमान्यात सोशल मीडिया म्हणजे काही तरुणांसाठी व्यसन झालं आहे. तिथे लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी ते कोणत्याही थराला जाण्यास तयार असतात. अनेकदा या नादात तरुण-तरुणी आपला जीव धोक्यात घालत असतात. यामध्ये बाईकवर स्टंट करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. अशाच एका युट्यूबरचा सध्या अपघात झाला असून, व्हिडीओ व्हायरल झाला आहे. टीटीएफ वासन असं या तरुणाचं नाव आहे. हाय स्पीड मोटरबाईक राईड्ससाठी तो ओळखला जातो. युट्यूबवर त्याचे अनेक फॉलोअर्स आहेत. मात्र बाईकवर स्टंट करताना नियमांचं उल्लंघन केल्याने पोलिसांनी अनेकदा त्याला चेतावणी दिली आहे. तसंच त्याला दंडही ठोठावण्यात आला आहे.
वासन रविवारी चेन्नई येथून कोईम्बतूरला निघाला होता. बलुचेट्टी चथिराम येथे सर्व्हिस लेनवर स्टंट करताना त्याचा भीषण अपघात झाला. पुढील चाक हवेत उडवत स्टंट करत असतानाच तोल गेल्याने त्याचा अपघात झाला. या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओत दिसत आहे की, टीटीएफ वासन अत्यंत वेगाने बाईक चालवत होता. यादरम्यान, त्याने स्टंटचा प्रयत्न केला असता तोल गेला आणि रस्त्याशेजारी जाऊन कोसळला. वेगात असल्याने त्याची बाईक अक्षरश: अलटी पालटी मारत हवेत उडत जाते.
So many questions.. IN BOTH VIDEO #TTFVasan violated the traffic rules, which makes other guys to copy him. Why still no proper action taken against him. Dear youth don’t get influenced by this kind of stupid.
— A k (@JustMyTweetssss) September 18, 2023
टीटीएफ वासनचं बाईकवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. पण सुदैवाने त्याचा जीव वाचला. कारण त्याने प्रोटेक्शन गेअर घातले होते. पण तो गंभीर जखमी झाला असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पुढील उपचारासाठी त्याला चेन्नईला पाठवण्यात आलं आहे.
पोलिसांनी या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज मिळवलं आहे. दरम्यान, टीटीएफ वासन जखमी असून उपचारानंतर पोलीस त्याची चौकशी करणार आहेत.
सोशल मीडियावर अनेकजण या अपघाताचा व्हिडीओ शेअर करत आहेत. एका युजरने म्हटलं आहे की "अनेक असे अनुत्तरित प्रश्न आहेत. दोन्ही व्हिडीओ टीटीएफ वासनने वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केलं आहे. दुसरे लोक याची नकल करतात. तरीही त्याच्याविरोधात योग्य कारवाई करण्यात का आलेली नाही. तरुणांनी उगाच यापासून प्रेरणा घेऊ नका. हा युट्यूब चॅनेल ब्लॉक करण्याची विनंती मी तामिळनाडू पोलिसांकडे करतो".