प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : कोरोना आला आणि सर्वच क्षेत्रांना मोठा फटका बसला. यावेळी बाजारात मास्क आणि सॅनिटायझरची मागणी देखील वाढली. अशावेळी ग्रामीण भागातील बचत गटांनी महत्वाची भुमिका बजावली आहे. बचत गटांच्या माध्यमातून सध्या लाखो मास्कची निर्मिती केली जात असून यामध्ये रत्नागिरी जिल्हा राज्यात अव्वल आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्कची कमतरता भासली पण बचत गटांनी ती भरून काढली. रत्नागिरीप्रमाणे राज्यातल्या कानाकोपऱ्यात सध्या हजारो माय-माऊलींचे हात बचत गटाच्या माध्यमातून कोरोनाविरूद्धच्या या लढाईत लागले आहेत. आपला संसार सांभाळत ही सारी खटाटोप रात्रंदिवस सुरू आहे.
या माध्यमातून लाखो मास्कची निर्मिती झाली आहे. शिवाय राज्याचा विचार करता करोडो रूपयांची उलाढाल देखील होत आहे. एकट्या रत्नागिरी जिल्ह्यात आजघडीला बचत गट अर्थात स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून तब्बल १ लाख १८ हजार ४८५ मास्कची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये चिपळूण तालुक्यात सर्वाधिक अर्थात ७६ हजार ४०१ मास्कची निर्मिती करण्यात आल्याचे महिला अधिकारी कांचन नागवेकर यांनी सांगितले.
रत्नागिरी तालुक्यामध्ये १५ रूपये प्रति मास्क याप्रमाणे ४७८७ मास्क, २५ रूपये प्रति मास्क याप्रमाणे १२५० मास्क तयार करण्यात आले.
राजापूर तालुक्यात १५ रूपये प्रति मास्क याप्रमाणे ८०० मास्क, २० रूपये प्रति मास्क या प्रमाणे ७४१० मास्क आणि २५ रूपये प्रति मास्क याप्रमाणे १००० मास्क तयार करण्यात आले.
चिपळूण तालुक्यामध्ये १५ रूपये प्रति मास्क याप्रमाणे ३६ हजार ६१० मास्क,
२५ रूपये प्रति मास्क याप्रमाणे ३७ हजार मास्क आणि २५ रूपये प्रति मास्क याप्रमाणे २७९१ मास्क तयार करण्यात आले.
संगमेश्वर तालुक्यात १५ रूपये प्रति मास्क याप्रमाणे ३०० मास्क, २० रूपये प्रति मास्क याप्रमाणे ६ हजार मास्क आणि २५ रूपये प्रति मास्क याप्रमाणे ४१० मास्क तयार करण्यात आले.
दापोलीमध्ये १५ रूपये प्रति मास्क याप्रमाणे ३०० मास्क तर 20 रूपये प्रति मास्क याप्रमाणे ४,१०० मास्क आणि २५ रूपये प्रति मास्क याप्रमाणे २०० मास्क तयार करण्यात आले.
खेडमध्ये १५ रूपये प्रति मास्क याप्रमाणे १ हजार मास्क, २० रूपये प्रति मास्क याप्रमाणे १० हजार मास्क तयार करण्यात आले.
गुहागरमध्ये १५ रूपये प्रति मास्क याप्रमाणे ७५० मास्क, २० रूपये प्रति मास्क याप्रमाणे १५०० मास्क आणि २५ रूपये प्रति मास्क याप्रमाणे ७५० मास्क तयार करण्यात आले.
मंडणगडमध्ये १५ रूपये प्रति मास्क याप्रमाणे ४५० मास्क , २२० रूपये प्रति मास्क याप्रमाणे ५० मास्क तयार करण्यात आले आहेत.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे यातून तब्बल २२ ते २५ लाखांची उलाढाल झाली असून महिलांना देखील चांगले पैसे मिळाल्याचे महिला अध्यक्षा लतिका बने सांगतात.
मास्क तयार करण्यामध्ये चिपळूण तालुका सर्वात अग्रेसर आहे. मास्क तयार करताना महिलांकडून सरकारच्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचं पालन केले जाते. तयार होणारे हे मास्क डबल आणि सिंगल लेयरचे असून ते स्वच्छ पाण्यानं धुवून पुन्हा देखील वापरता येतात.
जिल्ह्यात जरी १४ हजार बचत गट असले तरी उमेद अभियानाच्या माध्यमातून सध्या १०० बचत गटांमधील जवळपास ९०० ते १००० महिला मास्क तयार करण्याचं काम करत आहेत...
दरम्यान हे मास्क जिल्ह्यातील प्रमुख सरकारी कार्यालये, मेडीकल, ग्रामपंचायती शिवाय काही जण खासगी करता देखील वापरताना दिसत आहेत.
त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वूमीवर सध्या सर्वत्र निराशेचं वातावरण असताना ही बाब मात्र समाधानकारक अशीच आहे.