शेकरुची शिकार करुन व्हॉट्सएपवर डीपी, आरोपी ताब्यात

लिलाधर वराडकर असे या आरोपीचे नाव असून त्याला १४ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली

Updated: Apr 11, 2020, 06:38 PM IST
शेकरुची शिकार करुन व्हॉट्सएपवर डीपी, आरोपी ताब्यात  title=

प्रणव पोळेकर, झी मीडिया, सिंधुदुर्ग : लॉकडाऊनच्या काळात अति आवश्यकतेशिवाय घराबाहेर पडू नका असे निर्देश असताना याची पायमल्ली करण्यासोबतच शेकरुची शिकार करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लिलाधर वराडकर असे या आरोपीचे नाव असून त्याला १४ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. हा २५ वर्षाचा तरुण असून सिंधुदुर्ग येथे कुणकेरी येथे राहणारा आहे. तो भारतीय सैन्यदलात कार्यरत असून सुट्टीनिमित्र सावंतवाडीतील आपल्या गावी आला आहे.

शेकरु हा प्राणी वन्यजीव संरक्षण कायद्याच्या प्रथम श्रेणीत येतोय त्यामुळे वाघाप्रमाणे या प्राण्याला देखील संरक्षण असते. त्यामुळे हा प्रकार अतिशय गंभीर आहे. 

लिलाधर वराडकरने शेकरुची शिकार केल्यानंतर मेलेल्या शेकरु सोबतचे फोटो स्वत:चा व्हॉट्सएप डीपी म्हणून ठेवले होते. त्यानंतर हा प्रकार समोर आला. या आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या कलम ५१ (१) सह ९, ५१, ३९ (३) ५१ सह ५२, ५१ सह ४८ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आपण सर्वजण घरी राहणं अपेक्षित आहे. असे असताना अशी विकृत मानोवृत्ती ठेवून कोण शिकार करत असेल त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सांमत यांनी दिले आहेत.