Alcohol Reaction Time : Cheers......! असं म्हणत मद्याचे किंवा तत्सम पेयांचे ग्लास एकमेकांवर टेकवत ते खाली न ठेवताच पेयाचा एक घोट घेतला जातो. अनेकांसाठी मद्य ही सवयीची बाब, तर काही मंडळी ठराविक प्रसंग किंवा कार्यक्रमालाच मद्याचं सेवन करतात. तुम्हाला माहितीये का, हेच मद्य प्यायल्यानंतर त्याचे परिणाम शरीरावरही दिसून येतात.
मद्य प्यायलेली व्यक्ती ओळखण्याची एक सर्वसामान्य पद्धत म्हणजे ती व्यक्ती झिंगतेय का, विचित्र वागतेय का हे पाहणं. विविध प्रकारच्या मद्यामध्ये विविध प्रमाणात Alcohol असतं, ज्यामुळं नशा चढते आणि माणूस झिंगू लागतो.
आश्चर्याचा भाग म्हणजे जगभरातील अनेक देशांमध्ये मद्याच्या माध्यमातून गोळा होणाऱ्या करामुळं त्या त्या देशांतील शासनाच्या खात्यात मोठी रक्कम गोळा होते. हीच दारू, किंवा हे मद्य ज्यावेळी पोटात जातं तेव्हा काही मिनिटांतच त्याचे परिणाम दिसण्यास सुरुवात होते. जाणकार आणि अनेक निरीक्षणांतून समोर आलेल्या माहितीनुसार अल्कोहोल असणारे पदार्थ, मद्य प्यायल्यानंतर साधारण 6 मिनिटांनी त्याचे परिणाम दिसण्यास सुरुवात होते. म्हणजेच किमान 6 मिनिटांनंतर तुम्हाला नशा जाणवू लागतो.
मद्यप्राशनानंतर कोणत्याही गोष्टीसाठी प्रतिक्रिया देण्याचा तुमचा वेग मंदावतो. ज्यामुळं तुम्ही मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असाल तर अपघाताचा धोका अधिक असतो. ज्या मेंदूनतून तुम्हाला कृती करण्यासाठीच्या सूचना येतात तोच अशा प्रसंगी कमी कार्यक्षम असतो, म्हणून मद्यपानानंतर वाहन न चालवण्याचा सल्ला दिला जातो.
पोटात दारू लगेच शोषली जाते पण, लहान आतड्यात हा वेग कमी असतो. तुम्ही जर काहीही न खाता मद्यपान केलं, तर हे अल्कोहोल थेट तुमच्या आतड्यांपर्यंत पोहोतून ते रक्तात मिसळतं. ज्यानंतर ते हृदय आणि मेंदूपर्यंत जातं. रिकाम्या पोटी मद्यपान केल्यास नशा होण्यास फार कमी वेळ लागतो. आहारतज्ज्ञांच्या मते मद्यपान करणं शरीरास हानिकारकच आहे. पण, तरीही ही सवय असल्यास त्यापूर्वी कार्बोहाइड्रेट आणि प्रोटीन असणाऱ्या अन्नाचं सेवन करणं गरजेचं आहे.