Weight Loss Maggi: मॅगी, चाऊमीन हे प्रत्येकालाच खायला आवडतं. मात्र अति प्रमाणात मॅगी खाणंही आरोग्यासाठी घातक ठरते. मॅगीमध्ये पोषकतत्वांचा आभाव असतो तसंच, मैदा जास्त असल्यामुळं लठ्ठपणा, पोट फुगणे अशा समस्यांचा त्रास होऊ शकतो. मॅगीला पर्याय म्हणून तुम्ही घरातीलच एका पदार्थापासून मॅगी बनवू शकता. सोशल मीडियावर डायटीशियन मॅक सिंह याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत त्याने घरातील पदार्थांपासून मॅगी बनवली आहे. पाहूयात नेमकं काय आहे तो व्हिडिओ
अलीकडेच मॅगीचे वेड वाढत आहे. तसंच, स्ट्रीट फुड म्हणून चाउमीन खाण्याचे प्रमाण वाढत आहे. तसंच, काही फुड ब्लॉगर मॅगीवरही वेगवेगळे प्रयोग करुन बघत आहेत. पान मसाला मॅगी, फंटा मॅगी, पाणी पुरी मॅगी असे नवीन प्रयोग मॅगीवर केले जात आहेत. असाच एक हेल्दी प्रयोग मॅक सिंह यांनी केला आहे. तसंच, ही रेसिपी वजन कमी करण्यासही फायदेशीर आहे.
मॅक सिंह यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत, सुरुवातीला शिळी चपाती घेतली. त्यानंतर ही चपाती न्युडल्सप्रमाणे कापून घ्या. आता चपातीचे तुकडे एका पॅनमध्ये तेल गरम करुन घेतले. त्यानंतर त्यात चिरलेला कांदा, मिरचीची फोडणी दिली. नंतर यात टोमॅटोची प्युरी टाकून मिश्रण चांगले एकजीव करुन घेतले. नंतर त्यात लाल मिरची पावडर, हळद, मीठ टाकून त्यात शिळ्या चपात्याचे तुकडे टाकून पुन्हा मिश्रण ढवळून घ्या. शिळ्या चपातीपासून बनवलेली मॅगी तयार आहे.
मॅक सिंग यांचा या व्हिडिओला हजारो लाइक्स आणि कमेंट्स मिळाले आहेत. रोटी मॅगी असं या पदार्थाला त्यांनी नावं दिलं आहे. खरं तर या पदार्थात मॅगीचा अजिबात वापर केला नाहीये. तसंच, स्नॅक्ससाठीचा हा पदार्थ अनेकांना आवडला देखील आहे. या व्हिडिओवर एकाने कमेंट केली आहे की, यात ग्लुटेन आहे मग ते हेल्दी कसं आहे? त्यावर मॅकने म्हटलं आहे की, आपण युरोपियन नाहीत आपण ग्लुटेन खाऊ शकतो. मी आत्ता या रेसिपीत मैदाऐवजी गहू वापरले आहेत. तर, घरातीलच मसाल्यांचा वापर केला आहे. मॅगी मसाल्यात हाय सोडियमचा वापर केला जातो तो मी वापरलाच नाहीये, असं त्याने स्पष्ट केले आहे.