Gudi Padwa 2024: साडे तीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडवा हा सण मंगळवारी सगळीकडे साजरा होत आहे. गुढीपाडव्याला हिंदू धर्मात खूप मान्यता आहे. या दिवसापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते. गुढीपाडव्याला श्रीखंड करण्याची प्रथा आहे. श्रीखंड आणि पुरी असा फक्कड बेत आखला जातो. अनेकजण घरीच चक्का करुन श्रीखंड बनवतात. तर पुऱ्यांमध्येही विविध प्रकार करुन पाहतात. यंदाच्या गुढीपाडव्याला वेगळ्या प्रकारच्या पुऱ्या करुन पाहा.
पाकातली पुरी हा महाराष्ट्रातील पारंपारिक गोड पदार्थ आहे. सणासुदीला हा पदार्थ आवर्जून केला जातो. रुचकर आणि खूप दिवस टिकणारा असा हा पदार्थ आहे. तीन ते चार दिवस या पुऱ्या टिकतात आणि खायलाही खुशखुशीत लागतात. नेहमीच्या पुऱ्यांपेक्षा वेगळा काही प्रकार तुम्ही करु शकता. लहान मुलंही आवडीने पाकातल्या पुऱ्या खातील. या पुऱ्या कशा करायच्या व यासाठी काय साहित्य लागते? हे जाणून घ्या.
बारीक रवा- 1 कप
मीठ-चिमुठभर
तेल किंवा तूप- पुऱ्या तळण्यासाठी
दही-3 टेबलस्पून
साखर- 1 कप
लिंबाचा रस-1 टेबलस्पून
केशर-1/4 टीस्पून
वेलची पूड
केशरी खायचा रंग
सर्वप्रथम रव्यात चिमूटभर मीठ 2 टेबलस्पून केल किंवा तूप गरम करुन मिसळन घ्या. आता त्यात दही घालून कणिक घट्ट भिजवून घ्या. कणिक मळल्यानंतर अर्धा तासापर्यंत झाकून ठेवा. अर्ध्या तासांनी रवा थोडा कोरडा वाटला तर थोड्यासा पाण्याचा हात लावून पुन्हा मळून घ्या. मात्र लक्षात घ्या की पीठ जास्त मऊ होऊ देऊ नका.
आता कणकेचे छोटे छोटे गोळे करुन घ्या आणि जाडसर पुरी लाटून घ्या. तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवा. व एका बाजूला पाकही करायला घ्या. पाकासाठी एका पातेल्यात साखर व 1/2 कप पाणी मिसळून घ्या. साखर विरघळेपर्यंत मिश्रण हलवत राहा. उकळी आल्यानंतर 2 मिनिटे असेच मध्यम आचेवर उकळू द्या मग गॅस बारीक करा. आता या पाकात लिंबाचा रस, वेलदोड्याची पूड, केशर घालून पाक तयार करुन घ्या आणि गॅस बंद करा.
तेल तापल्यानंतर मध्यम आचेवर थोड्या पुऱ्या किचिंत लालसर होईपर्यंत तळून घ्या.आता तळलेल्या पुऱ्या गरम पाकात टाका आणि प्रत्येक पुरीवर पाक टाकून चांगलं पाकात घोळवून घ्या. पुऱ्या चांगल्या पाकात मुरल्या की एका ताटात काढून घ्या. आता तुमच्या पाकातल्या पुऱ्या तयार आहेत. या पुऱ्या रुम टेम्प्रेचरवर 3-4 दिवस छान टिकतील.