सौंदर्य हे प्रत्येकालाच प्रिय असतं. ऐन तारुण्यात आलेले पिंपल्स् ते चाळीशी नंतर चेहऱ्यावर येणारा कोरडेपणा प्रत्येकालाच नकोसा असतो. त्याशिवाय भरीला भर म्हणजे वाढत्या प्रदूषणाचे गंभीर परिणाम त्वचेवर दिसून येतात. होळीच्या सणाला खेळले जाणारे रंग हे बऱ्याचदा रासायनिक प्रक्रिया केले असतात. त्यामुळे रंग खेळून झाल्यावर त्वचेला पोषक घटकांची आवशक्यता असते. सणावाराला छान दिसावं, छान मेकअप करावा असं प्रत्येकालाच वाटतं. बऱ्याच जणांची स्कीन अतिसंवेदनशील असते, त्यामुळे वातावरणातील प्रदूषण आणि मेकअपमुळे चेहऱ्यावर पिंपल्स्, कोरडेपणा आणि सुरकुत्या येतात. यंदा होळी झाल्यानंतर येणाऱ्या गुढीपाडव्याला नैसर्गिकरित्या त्वचेचं सौंदर्य कसं वाढवायचं ते जाणून घेऊयात.
सतत केमिकलचा थेट संबंध त्वचेशी येत असल्यास व्यक्ती वयापेक्षा जास्त वयस्कर दिसायला लागते. त्यामुळे केमिकल मिश्रित सौंदर्य प्रसाधनांचा वापर न करता नैसर्गिक घटकांचा वापर केल्याने त्वचेचं आरोग्य सुधारतं. सतत पिंपल्स् येणं किंवा चेहऱ्या सुरकुत्या येणं सारखी समस्या होत असल्यास मनुक्याच्या पाण्याचा वापर त्वचेसाठी फायदेशीर ठरतं. मनुके खाणं जसं आरोग्यवर्धक मानलं जातं.तसंच मनुक्याचा वापर त्वचेच्या आरोग्यासाठी उत्तम उपाय आहे. महागडे स्कीन केअर प्रॉडक्ट न वापरता मनुक्याचं पाणी चेहऱ्यावर लावावं. काचेच्या एक कप गरम पाण्यात रात्रभर 15 ते 20 मनुके भिजत ठेवायचे. सकाळी उठल्यानंतर हे पाणी गाळून घ्यावं. त्यानंतर हलक्या हाताने या पाण्याने चेहऱ्यावर मसाज करावा. त्यामुळे स्कीन ग्लो करते. सलग महिनाभर हा उपाय केल्याने त्वचा टवटवीत होण्यास मदत होते. पार्लरमध्ये कोणत्याही प्रकारची महागडी ट्रीटमेंट न वापरता घरच्या घरी सहज सोप्या पद्धतीने केलेला हा उपाय चेहऱ्यासाठी खूपच फायदेशीर ठरतं.
मनुक्यात असलेल्या अँटिऑक्सिडंटमुळे त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होते. मनुक्याच्या पाणी फेस टोनर म्हणून ही वापर केला जाऊ शकतो. या व्यतिरीक्त भिजवलेल्या मनुक्यांची बारीक पेस्ट तयार करून त्यात ताज्या कोरफडीचा गर आणि विटामीन ई कॅप्सूल एकत्रकरून मनुक्याचं हे मिश्रण तुम्ही वापरल्यास त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. चेहऱ्यावरचे काळे डाग कमी करण्यास तसंच सतत पिंपल्स् येत असतील तर मनुक्याचा फेस टोनर क्लिंजींगचं काम करतो. त्यामुळे होळी खेळल्यानंतर स्कीन केअर रुटीनमध्ये तुम्ही मनुक्याचा वापर नक्की करू शकता.