Kitchen Tips For Frying: दिवाळी म्हटलं की फराळ हा आलाच. फरळातील पदार्थ करताना बहुतांशवेळी तळणीचे पदार्थ येतात चकली, कडबोळी, शेव, करंजा असे पदार्थ तेलाशिवाय होऊच शकत नाही. असं म्हणतात की, दिवाळीचा फराळ करताना भरती-ओहोटीच्या वेळा पाळाव्यात. या दाव्यामागे काही तथ्यही सांगण्यात येतात. पण यामागील दावा किती खरा आहे, हे जाणून घेऊया.
लोकप्रिय युट्युबर मधुरा बाचल यांनी यासंदर्भात एक व्हिडिओ अपलोड केला आहे. त्यात त्यांनी भरती आणि ओहोटी यांचा तळणीवर काय परिणाम होतो, याबाबत माहिती दिली आहे. त्यापूर्वी सोशल मीडियावर काय दावा केला जातो, हे जाणून घेऊया. जर पदार्थ भरतीच्या वेळेत तळला गेला तर तेल कमी लागते आणि ओहोटीच्या वेळी पदार्थ जास्त तेल पितो. या दाव्यामागे एक शास्त्रीय कारण देखील सांगितलं गेलं आहे.
भरतीच्या वेळेस हायड्रोफोबिक फोर्सेस म्हणजे जलविरोधी क्रिया अधिक कार्यरत असतात. भरतीची वेळ असते त्या तीन ते चार तासात पदार्थ तळला तर कमी तेल शोषलं जातं. भरतीच्या वेळेत तळणीचे तेल हे पाण्याच्या विरुद्ध असल्याने पाणी शोषत नाही. समुद्र किनारपट्टीवर जे लोक राहतात ते अनेकदा या पद्धतीचा वापर करताना दिसतात.
ओहोटीच्या वेळेत हायड्रोफिलीक फोर्सेस असतात. पाण्याचा प्रभाव आणि पृथ्वीवरील जलतत्वाचा परिणाम होऊन हायड्रोफोबिक इफेक्ट वाढतो. त्यामुळं ओहोटी लागली की तळण अधिक तेल पीत असणार, असा दावा केला जातो.
दरम्यान, तळणीचा हा नियम खिचडी, आमटी आणि भाजी हे पदार्थ करतानाही लागू होतो. ऐरवी खिचडी, आमटी आणि वरण करताना तीन शिट्ट्यांमध्ये शिजते. मात्र ओहोटीच्या वेळेस अधिक वेळ लागू शकतो. झी 24 तास मात्र या दाव्याची पुष्टी करत नाही.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)