आई-मुलाचं, बाप-लेकीचं नातं खास असतंच. पण यासोबत बाप आणि लेकाच्या नात्याची देखील एक वेगळी बाजू आहे. बाप कायम आपल्या मुलामध्ये एक मित्र पाहत असतो. मुलासाठी अतिशय शांतपणे सर्वस्वपणाला अर्पण करणारा बाप अनेकांनी अनुभवलाच असेल. आज बाप-लेकाची चर्चा होण्यामागचं कारण आहे सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या दोन गोष्टी.
अभिनेता विक्रांत मेस्सीने मुलगा 'वरदान'च्या नावाचा टॅटू आपल्या हातावर गोंदवून घेतला आहे. विक्रांतने हा फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर स्टोरीमध्ये शेअर केला आहे. ऍडिशन आणि ऍडिक्शन.. मला दोघांवर प्रेम आहे असं म्हणत त्याने ही पोस्ट शेअर केली आहे. एवढंच नव्हे तर वरदानच्या नावाचा टॅटू आणि सोबतच त्याची जन्मतारीख 7-2-2024 असं त्याने त्या टॅटूमध्ये लिहिलं आहे.
तर दुसरीकडे गायक शान हा कायमच तरुणींच्या गळ्यातील ताईत राहिलेला आहे. पण आता शानची तिच सावली त्याच्या मुलामध्ये पाहायला मिळत आहे. शानचा मुलगा माही हा रेडिओ सिटीच्या एका कार्यक्रमात गायक किशोर कुमार यांचं लोकप्रिय गाणं 'मेरे सामने वाली खिडकी' हे गाणं गात आहे. महत्त्वाचं म्हणजे शानचा मुलगा अगदी शान सारखाच दिसतो. त्यांचे हाव-भाव अगदी सारखीच दिसत आहे.
या दोन्ही बाबांनी आपल्या लेकासोबतच्या या खास गोष्टी सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. यावरुन बाप-लेकाचं नातं किती खास असतं हे अधोरेखित होत आहे. हे नातं आणखी मजबूत होण्यासाठी वडिलांनी काय करावं?
मुलगा लहान असेल तरीही वडिलांनी त्याच्याशी ठरवून वेळ घालवायला हवा? कारण यामुळे तुमचं नातं अगदी सुरुवातीपासूनच घट्ट होतं. वडिलांनी मुलांसोबत अगदी लहानपणापासूनच संवाद साधणं गरजेचं आहे. यामुळे मुलं लहान वयापासूनच वडिलांशी मोकळेपणे बोलू लागतो. तुम्ही शाळा-कॉलेजमध्ये जा किंवा नोकरी करा, पण तुम्हाला तुमच्या मुलांसोबत चांगले नाते हवे असेल तर तुम्ही तुमच्या मुलांसोबत वेळ घालवला पाहिजे. तुम्ही त्यांच्या सुट्टीच्या दिवशी त्यांच्यासोबत बसू शकता, बोलू शकता, त्यांच्यासोबत बाहेर जाऊ शकता.
शानने शेअर केलेल्या व्हिडीओत त्या दोघांचं गाणं अतिशय खास वाटत आहे. कारण आहे शानने मुलासोबत शेअर केलेल्या गाण्यासंबंधीतील आठवणी. असाच बॉण्ड पालक आणि मुलांमध्ये असणे गरजेचे असते. कारण तुमच्या आठवणीतून ते मुलं शिकत असतं. या गोष्टी मुलासाठी असतात खास. तसेच मुलांना अटेन्शन हवं असतं हेच अटेन्शन जर पालकांकडून आणि खास करुन वडिलांकडून मिळालं तर त्याचा आनंद खास असतो.