वाल्मिक कराडला Sleep Apnea! झोपेतही मास्क घालावं लागणारा हा आजार काय? वाचा लक्षणं, कारणं

What Is Sleep Apnea: सरपंच संतोष देशमुख हत्येसंबंधित खंडणी मागितल्याच्या प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडने आपल्याला स्लीप अ‍ॅप्नीयाचा त्रास असल्याचं सांगितलं आहे. पण हा स्लीप अ‍ॅप्नीया आजार आहे तरी काय?

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 3, 2025, 12:22 PM IST
वाल्मिक कराडला Sleep Apnea! झोपेतही मास्क घालावं लागणारा हा आजार काय? वाचा लक्षणं, कारणं title=
वाल्मिकीनेच हा आजार असल्याचा खुलासा केला आहे (फोटो सोशल मीडियावरुन साभार)

What Is Sleep Apnea: बीडमधील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी मागीतल्या प्रकरणी बीडमधील राजकीय नेत्यांमध्ये उठबस अलेले बडे प्रस्थ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाल्मिक कराडला (Walmik Karad) सीआयडीने ताब्यात घेतलं आहे. 31 डिसेंबर रोजी वाल्मिक कराड पुण्यातील सीआयडीच्या कार्यालयात शरण आल्यानंतर आता त्याने कोर्टामध्ये दाखल केलेल्या एका विनंती अर्जाची चर्चा आहे. हा अर्ज समोर आल्यानंतर वाल्मिक कराडला कथितरित्या स्लीप अ‍ॅप्नीया (Sleep Apnea) हा आजार असल्याचं सांगितलं जात आहे. वाल्मिक कराडनेच आपल्याला स्लीप अ‍ॅप्नीया हा आजार असल्याचा दावा कोर्टाला दिलेल्या विनंती अर्जात केला आहे. त्यामुळेच झोपताना आपल्याला ऑटो सीपॅप मशीनची गरज पडत आहे. त्यामुळेच ही मशीन कोठडीत असताना आपल्याला दिली जावी अशी मागणी वाल्मिक कराडने केली आहे. कराडने ही मशीन लावण्यासाठी 24 तास एक मदतनीस हवा असल्याचंही विनंती अर्जात म्हटलं आहे. मात्र वाल्मिक कराडला असलेला हा स्लीप अ‍ॅप्नीया आजार आहे तरी काय? तो कोणाला होतो? त्याची लक्षणं काय आहेत? याबद्दल जाणून घेऊयात...

स्लीप अ‍ॅप्नीया म्हणजे काय? यातं होतं काय?

स्लीप अ‍ॅप्नीया हा श्वसनासंदर्भातील आजार आहे. या आजारामध्ये झोपेत असताना श्वास घ्यायला त्रास होतो. स्लीप अ‍ॅप्नीयामध्ये हा आजार ऑब्सट्रक्टिव स्लीप अ‍ॅप्नीया, सेंट्रल स्लीप अ‍ॅप्नीया आणि कॉन्प्लेक्स स्लीप अ‍ॅप्नीया या तीन प्रकारचा असतो. यापैकी ऑब्स्ट्रक्टीव्ह स्लीप अ‍ॅप्नीया सर्वात सामान्य प्रकारचा आजार आहे. याच्या नावावरुन श्वास घेताना अडथळा निर्माण होणार आजार असल्याचं स्पष्ट होतं आहे. हा आजार असलेल्या व्यक्ती झोपल्यावर त्यांच्या नाकामध्ये एअर फ्लो कमी होतो. ऑब्सट्रक्टिव स्लीप अ‍ॅप्नीयामध्ये नाक आणि तोंडाच्या वरच्या भागामध्ये हवा भरली जाते. श्वसननलिकेमध्ये हवेचा फ्लो कमी झाल्याने श्वाच्छोश्वासात अडथळा निर्माण होतो. त्यामुळेच श्वास घ्यायला त्रास होतो. स्लीप अ‍ॅप्नियाची 90-96 प्रकरणं ही ऑब्सट्रक्टिव स्लीप अ‍ॅप्नीयाची असतात. याची लक्षणं पाहूयात...

स्लीप अ‍ॅप्नीयाची लक्षणं कोणती?

> दिवसभर जास्त झोप येणे आणि आळस येत रहाणे. 
> वारंवार जोरात कळ येऊन लघवीला होणे 
> एकाग्रता कमी होणे आणि डोकं जड वाटत राहणे.  
> झोपेत असताना अस्वस्थ वाटणे 
> श्वास गुदमरतोय किंवा थांबत थांबत घेतला जातोय असं वाटणं
> अचानक छातीत खूप जोरात कळ येणे आणि घाम फुटणे 

स्लीप अ‍ॅप्निया नेमका कशामुळे होतो?

> श्वासनलिकेमध्ये अनावश्यक पेशींची वाढ झाली तरी झोपेत श्वास घेताना त्रास होतो.
> नाक, गळा आणि तोंडाच्या आतल्या भागातून आकार कमी होणे किंवा टॉन्सिल्सचा आकार वाढल्यानेही स्लीप अ‍ॅप्नीयाचा त्रास उद्भवू शकतो.
> मोठ्या प्रमाणात अल्कोहोलचे सेवन करणाऱ्या किंवा झोपेच्या गोळ्या घेणाऱ्यांना सुद्धा स्लीप अ‍ॅप्नीया असू शकतो.
> एखाद्या व्यक्तीचे वजन जास्त असेल तर किंवा गळ्याचा भाग बाहेरच्या बाजूने वाढला असेल तर त्याला स्लीप अ‍ॅप्नीयाचा त्रास होऊ शकतो.
> जंक फूड आणि सतत बसून काम करण्यासोबतच शारीरिक हलचाली कमी झाल्याचा एकत्रितपणे परिणाम होऊनही काहींना स्लीप अ‍ॅप्नीया होत असल्याचं दिसून आलं आहे.

ऑटो सीपॅप मशीन काय असते?

ऑटो सीपॅप मशीनच्या मदतीने स्लीप अ‍ॅप्नीयाच्या रुग्णांना मास्क आणि नळीच्या मदतीने थेट श्वसननलिकेमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. रात्री झोपताना हे मशीन ऑक्सिजन मास्क लावल्याप्रमाणे तोंडाला लावून झोपण्यास सांगितलं जातं.

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)