Winter Diet : बदलत्या ऋतूचक्रानुसार आहारात आणि जीवनशैलीमध्येही काही महत्त्वाचे बदल करणं अपेक्षित आहे असा सल्ला तज्ज्ञ देतात. कारण, शरीर ज्यावेळी ठराविक ऋतूचक्राशी एकरुप होत असतं तेव्हातेव्हा त्याला पोषण देणाऱ्या घटकांशीही समतोल साधण्याची संधी दिली जाणं अपेक्षित असतं. असं केल्यासच रोगराई, आजारपणापासून दूर राहत सुदृढ जीवनशैली सहजगत्या आत्मसात करता येते.
हल्लीच्याच दिवसांचं उदाहरण घ्यावं, तर सध्या हिवाळा सुरू असून या दिवसांमध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांच्याच अनेक सवयींमध्ये बदल होतात. विशेष म्हणजे लहान मुलांच्या दिनचर्येत या काळात सातत्यानं बदल होतात. अनेकांच्या आहाराच्या सवयी बदलून त्यांची भूक वाढते. भूकेच्या वेळा आणि प्रमाण बदलल्यामुळं जेवणासोबकच इतर पदार्थ अनावधानानं अमर्यादपणे खाल्ले जातात.
पदार्थाच्या चवीवर जोर दिला जात असताना त्या पदार्थातून शरीराला मिळणारी पोषक तत्त्वं, कॅलरी, फॅट आणि साखरेच्या प्रमाणाकडे मात्र दुर्लक्ष होतं. अशाच बेसावधपणे खाण्याच्या सवयीमुळं अनेकदा हिवाळ्याच्या दिवसांमध्ये वजन वाढण्याचा धोका जास्त असतो. वजन वाढत जाऊन पुढे स्थूलता, मधुमेह, हृदयरोग अशाही समस्या अजाणपेपणे डोकं वर काढू लागतात असा स्पष्ट इशारा सध्या वैद्यकिय आणि आहारविषयक तज्ज्ञ मंडळी देत आहेत.
या ऋतूमध्ये मुळातच तापमानात घट नोंदवली जाते. अशा वेळी शरीरातील अंतर्गत उर्जेसाठी अन्नाचं सेवन हा एकमेव पर्याय असल्यामुळं आहार आणि इतर पदार्थांवर रोजच्याहून जास्त प्रमाणात ताव मारला जातो. शरीराला आवश्यक उर्जेचा पुरवठा करणं हा यामागचा हेतू असला तरीही याच सवयीमुळं मग वजन वाढू लागतं.
हिवाळ्यात अनेक मंडळींना कार्ब्स अर्थात कार्बोदकांचं सेवन करण्याची इच्छा होते. यातूनच शरीरात साखरेची भर पडत असून, त्यामुळं वजन वाढण्यास वाव मिळतो. अनेकदा थेट गोडाच्याच पदार्थांवर ताव मारला जातो. पण, अशानं शरीरारातील साखरेचं प्रमाण चिंताजनकरित्या वाढतं हे नाकारता येत नाही. गोड खाल्ल्यानं शरीरातील इन्सुलिनमध्ये असंतुलन होऊनही अनेकजा जास्त भूक लागते.
हिवाळ्यातील या घातक सवयीवर आळा घालण्यासाठी सर्वप्रथम आहाराच्या वेळा निश्चित करणं ही महत्त्वाची बाब. आहारात प्रोटीन पदार्थांचा समावेश करत नियमित व्यायाम हासुद्धा यावर उत्तम उपाय. याशिवाय पुरेसं पाणी पिण्याची सवयही वाढलेल्या भुकेला नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकते.
(वरील माहिती सामान्य संदर्भांवर आधारित असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही. आहारविषयक बदलांपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)