मालेगावात कोरोनाचा धुमाकूळ, आरोग्यमंत्री-गृहमंत्र्यांची तातडीने भेट

कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव हा मालेगावात होत आहे. मालेगावात २४ तासांत कोरोनाचे ८२ नवे रुग्ण  आढळून आले आहेत.  

Updated: Apr 30, 2020, 08:20 AM IST
 मालेगावात कोरोनाचा धुमाकूळ, आरोग्यमंत्री-गृहमंत्र्यांची तातडीने भेट title=
संग्रहित छाया

नाशिक : कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव हा मालेगावात होत आहे. मालेगावात २४ तासांत कोरोनाचे ८२ नवे रुग्ण  आढळून आले आहेत. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत २७६ कोरोनाबाधित असून एकट्या मालेगावात २५३ कोरोनाग्रस्त आहे. दिवसागणिक मालेगावात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. डॉक्टर, पोलीस, नर्स यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. येथील कोरोनाची साखळी मोडण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. येथे ८०० पोलीस आणि एसआरपीएफ तुकडया तैनात करण्यात आल्या आहेत. दरम्यान, काल आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी येथील परिस्थितीचा आढावा घेतला आणि सतर्तकतेच्या सूचना केल्या आहेत.

मालेगावात कोरोनाचा धुमाकूळ 

▪️आता पुन्हा २७ जण कोरोना पॉझिटिव्ह 
▪️२४ तासात ८२ नवीन रुग्ण 
▪️आज सकाळी मालेगावात ११ कोरोना बाधित..
▪️रात्री दोन टप्प्यात पहिले ११:४५ वा. २० रुग्ण 
▪️नंतर १२ वाजता २४ रुग्ण
▪️नंतर तिसऱ्या अहवालात २७ कोरोना बाधित
▪️असे एकूण ८२  कोरोना बाधीत..
▪️नाशिक जिल्हा : २७६ 
▪️मालेगाव : २५३ 

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतला आढावा

मालेगावात कम्युनिटी स्प्रेडचा धोका वाढला आहे. त्यामुळे लॉकडाऊनचे निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. येथे पोलीस सुरक्षेत अधिक वाढ करण्यात आली आहे. नागरिक ऐकत नसल्याने पोलीस कुमकही वाढविण्यात आली आहे. मालेगावात सध्या आठशे पोलीस आहे.  एसआरपीएफ तुकडया तैनात आहेत. आवश्यकता असल्यास अधिक पोलीस आम्ही पाठवू असं सांगत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मालेगावात कुठल्याही परिस्थितीत कुमक कमी पडणार नाही, असे आश्वासन दिले आहे. परराज्यातील कामगारांना घरी पाठविण्याबाबत तातडीने निर्णय घेणार आहोत, असही त्यांनी स्पष्ट केले आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट

तर दुसरीकडे मालेगावात कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी या भागाला भेट दिली. तसेच काल नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कायदा, सुव्यवस्था,सार्वजनिक आरोग्य व प्रशासकीय उपाययोजना यासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी तातडीने उपाय-योजना करण्याचे आदेश जिल्ह्याधिकाऱ्यांना देण्यात आले.

मालेगावमध्ये कोरोनाच्या संकटाशी लढणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासमोर आपली कैफियत मांडली. पोलीस सुरक्षा, पीपीई कीट आणि इतर सुविधांबाबत कर्मचाऱ्यांनी मागणी केली. या सर्व मागण्या टोपेंनी तातडीनं मंजूर केल्या आणि संबंधितांना अंमलबजावणीचे आदेश दिले. तर मालेगावात रुजू होण्यास टाळाटाळ करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करणार असल्याचा इशाराही टोपे यांनी दिला.