अतिष भोईर, झी मीडिया, कल्याण : इन्कम टॅक्सची (Income Tax ) नोटीस आली की भल्या भल्यांना धडकी भरते. उत्पन्नाप्रमाणे लोकांना कर भरावा लागतो. कर चुकवणाऱ्यांना कर वसुलीसाठी इन्कम टॅक्सकडून नोटीस पाठवली जाते. मात्र,
कल्याण (Kalyan) सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीला 1 कोटी 14 लाखांची नोटीस पाठवली आहे. विशेष म्हणजे याचा पगार फक्त दहा हजार रुपये आहे. ही नोटीस पाहून या व्यक्तीच्या पायाखालची जमीनच सरकली.
चंद्रकांत वरक असे या व्यक्तीचे नाव आहे. ते कल्याण येथे राहतात. सुरक्षा रक्षक असलेल्या चंद्रकांत यांना जेमतेम 12 ते 15 हजार रुपये इतका पगार आहे. चंद्रकांत वरक यांना इन्कम टॅक्स विभागाने 1 कोटी 14 लाखांची नोटीस पाठवली आहे. या नोटीस मुळे वरक यांना मोठा मनस्ताप झाला आहे.
नोटीस हातात पडताच चंद्रकांत यांनी तात्काळ आयकर कार्यालयात धाव घेत विचारणा केली. यावेळी आयकर अधिकाऱ्यांनी त्यांना त्यांच्या पॅन कार्ड आणि कागदपत्राचा वापर करून चीन मधून काही वस्तूची खरेदी करण्यात आल्याची माहिती दिली. त्यावरील कर भरणा केलेला नसल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी आपण असेच काहीच मागवले नसल्याने आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले. हा सर्व फसवणुकीचा प्रकार असल्याचे लक्षात येताच आयकर अधिकाऱ्यांनी चंद्रकांत यांना तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला.
56 वर्षीय चंद्रकांत वरक हे कल्याणातील ठाणकरपाडा परिसरात चाळीत आपल्या बहिणीसह राहतात .उदरनिर्वाह करण्यासाठी ते कधी हाउसकीपिंग, सुरक्षा रक्षक म्हणून तर कधी कुरीअर बॉय म्हणून काम करतात. यातून त्यांना महिन्याला जेमतेम 10 ते 15 हजार रुपये उत्पन्न मिळते. त्यांची आर्थिक परिस्थिती देकील अत्यंत बेताची आहे.
1 फेब्रुवारी 2023 रोजी चंद्रकांत यांना इन्कम टॅक्स विभागाकडून 1 कोटी 14 लाख रुपयाची नोटीस मिळाली आहे. ही नोटीस पाहून काय करावं हे चंद्रकांत यांना सुचनास झाले. आता या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार करणार असून सरकारने आणि संबंधीत विभागाने आपली सुटका करावी अशी विनंती त्यांनी केली आहे.
नुकत्याच सादर झालेल्या देशाच्या अर्थसंकल्पात (Union Budget 2023 ) सरकारने सात लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले आहे. 9 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर केवळ 45,000 रुपये कर आकारला जाईल. 3 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांकडून कोणताही कर आकारला जाणार नाही. 3 ते 6 लाखांच्या उत्पन्नवार 5 टक्के कर आकारला जाणार आहे. 6 ते 9 लाखाच्या उत्पन्नावर 10 टक्के कर, 9 ते 12 लाख उत्पन्नावर 15 टक्के कर, 12 ते 15 लाखावर 20 टक्के कर तर 15लाखांहून जास्त उत्पन्न असणाऱ्यांना 30 टक्के कर लावला जाणार आहे.