राज्यात १० महिन्यात ११ हजारांवर अपघात बळी

औरंगाबादमध्ये ९ महिन्यात ८६७ अपघात

Updated: Dec 24, 2019, 08:05 AM IST
राज्यात १० महिन्यात ११ हजारांवर अपघात बळी title=
संग्रहित फोटो

विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : औरंगाबाद शहर आणि जिल्ह्याची  वाढलेली अपघाताची आकडेवारी धक्कादायक आहे. गेल्या ९ महिन्यांची आकडेवारी पाहता अपघातात वाढ झाल्याचं दिसतंय. २०१८ मध्ये औरंगाबादमध्ये झालेल्या ९१२ अपघातात ४१७ लोकांचा मृत्यू झाला. तर २०१९ मध्ये झालेल्या ८६७ अपघातात ४१६ लोकांचा मृत्यू झाला आहे. 

२०१८ आणि २०१९ ची आकडेवारी पाहता ८३३ लोकांचा मृत्यू आणि १२९४ लोक जखमी झाले आहेत. वारंवार अपघात होणारी ठिकाणं परिवहन विभाग ब्लँक स्पॉट म्हणून घोषित करतं. औरंगाबाद ग्रामीणमध्ये ६३ तर शहरात २१ ब्लँक स्पॉट प्रशासनाने घोषित केलेत, मात्र अपघात काही कमी होत नाही. परिवहन विभाग यासाठी कसोशीने प्रयत्न करतंय.

फक्त औरंगाबादच नाही तर राज्यातील अपघाताची आकडेवारीही तितकीच बोलकी आहे, राज्यात गेल्या १० महिन्यात झालेल्या ३० हजार अपघातात ११ हजारांवर लोकांचे बळी गेले आहेत. २०१८ च्या तुलनेत ही आकडेवारीही बरीच जास्त आहे.

नागरिकांनी नियम पाळले, वाहन चालवतांना भान ठेवलं तर निश्चितपणे काही प्रमाणात अपघात कमी होतीलही, मात्र सातत्याने वाढणारी वाहनांची संख्या आणि अपुरे पडणारे रस्ते हेही अडचणीचं ठरतंय. त्यामुळे  जोपर्यंत उपाययोजना होणार नाही तोपर्यंत अपघाताची आणि त्यात बळी जाणा-यांची संख्य़ा कमी होणार नाही हेही तितकंच खरं.