Maharashtra Politics : अजित पवार यांच्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादी पक्षात उभी फुट पडली. निवडणुक आयोगाने राष्ट्रवादी पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला दिले आहे. यामुळे शरद पवार गट नव्याने पक्ष उभारणी करत आहे. तर, अजित पवार गच पक्ष संघटना मजबुत करण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. मावळमध्ये अजित पवार गटात नाराज असलेले 137 जण शरद पवारांच्या भेटीला आले आहेत.
मावळ मधील अजित पवार गटातील नाराज 137 जणांनी आपला राजीनामा काही दिवसांपूर्वी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्याकडे सोपवला होता. त्यानंतर मावळ मध्ये अजित पवार गटाला मोठा धक्का बसला होता. मात्र, आता मावळ मधील अजित पवार गटातील नाराज 137 पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी आज शरद पवार यांची प्रत्यक्ष भेट घेतली. येत्या गुरुवारी शरद पवार हे मावळ तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा संवाद मेळावा घेणार आहेत. यावेळी मावळ तालुक्यातील अजित पवार गटातील नाराज 137 जण शरद पवार यांच्या उपस्थितीत शरद पवारांची राष्ट्रवादी यात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता गुरुवारी होणाऱ्या शरद पवारांच्या मेळाव्यात तुतारी वाजण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. गुरुवारी होणाऱ्या शरद पवारांच्या मेळाव्याकडे संपूर्ण मावळ तालुक्याचे लक्ष लागले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिरूरमध्ये एकाच वाहनातून प्रवास केला. उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्यात एक बैठकही झाली. आढळराव पाटलांनीच मंचरमध्ये अजित पवारांचं स्वागत केलं. अजित पवारांनी शिवाजी आढळरावांच्या शिक्षण संस्थेला भेटही दिली. आढळराव पाटील यांची शिरूर लोकसभेची उमेद्वारी जवळपास निश्चित मानली जातेय. आढळराव अजित पवार गटात प्रवेश करुन निवडणूक लढण्याची शक्यता आहे.
अजित पवार गटाची लोकसभा निवडणुकीसंदर्भात महत्त्वाची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची उद्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात महत्त्वाची बैठक होणार आहे. मंगळवारी दुपारी अडीच बाजता मुंबईत महिला आर्थिक विकास महामंडळ हॉलमध्ये ही बैठक होतेय. दोन दिवस होणा-या बैठकीत मंत्री, आमदार, खासदार, जिल्हाध्यक्षांना बोलावण्यात आलंय. नाशिक, दिंडोरी, उत्तर पूर्व मुंबई, ईशान्य मुंबई, गोंदिया-भंडारा, हिंगोली, रायगड, धाराशिव या जागांचा आढावा घेतला जाणार आहे. तर, बुधवारी कोल्हापूर, बुलडाणा, माढा, सातारा, शिरूर, बारामती, परभणी, अहमदनगर, गडचिरोली मतदारसंघाचा आढावा घेतला जाईल.