उपराजधानी हादरली, अल्पवयीन मुलीवर एकाच रात्रीत दोनवेळा सामुहिक बलात्कार

तीन जणांना अटक, फरार कुलींचा शोध सुरु

Updated: Aug 2, 2021, 09:03 AM IST
उपराजधानी हादरली, अल्पवयीन मुलीवर एकाच रात्रीत दोनवेळा सामुहिक बलात्कार

नागपूर :  एका अल्पवयीन मुलीवर ऑटोचालक आणि कुलींनी सामुहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे. तूर्त याप्रकरणी चार ऑटोचालक व दोन कुलीं आरोपी असल्याच निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी तपास सुरु असून आरोपी वाढण्याची शक्यता आहे. पीडित मुलगी गुरूवारी घरातून निघून नागपूर रेल्वेस्थानकावर आली. मात्र एकट्या मुलीला पाहून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. (16-year-old gang-raped twice in 3 hrs at Nagpur )

अल्पवयीन मुलीकडे पुरेसे पैसे नसल्याने ती रेल्वेने जाऊ शकली नाही. त्याच वेळी ऑॅटोचालक मोहंमद शहानवाज उर्फ साना वल्द मोहंमद रशीद याने तिला मदत करण्याच्या बहाण्याने त्याच्या खोलीवर नेले. तिथे अन्य एक ऑटोचालक मित्र मोहंमद तौसीफ वल्द मो. युसूफ व मोहंमद मुशीर याच्यासह आणखी एकाला बोलावून घेतले. या चौघांपैकी दोघांनी गुरूवारी रात्री तिच्यावर बलात्कार केला तर दोघांनी मेयो चौकातील मेट्रो उड्डाणपुलाखाली ऑॅटोत बलात्कार करून शुक्रवारी पहाटे तिला मेयो रूग्णालया जवळ सोडून दिले.

मेयो जवळ एकटीच बसलेल्या या मुलीला काही लोकांनी परत रेल्वेस्थानकावर आणून सोडले. रेल्वे अधिकाऱ्यांनी तिची वैद्यकीय व कोरोना तपासणी करून तिला आशा किरण बालगृहात दाखल केले. ही मुलगी दोन दिवस आशा किरण बालगृहात होती. बालगृहाच्या अधीक्षीकेने तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिथे तिच्याबाबत घडलेला प्रसंग सांगितला. त्या नंतर आरपीएफने चाईल्ड लाईन कर्मचारी व बालगृहाच्या अधीक्षीकेसमक्ष तिचा जबाब नोंदवून घेतला. त्या नंतर रेल्वे पोलिस अधीक्षक यांनी आरोपींना ताब्यात घेतले. घटनास्थळ बर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने तिथे सामुहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.