रायगड समुद्र किनाऱ्यावर दोन दिवसांत 5 मृतदेह आले वाहून

अलिबाग तालुक्यात शनिवारी 4 तर मुरूड येथे शुक्रवारी रात्री 1 मृतदेह आढळला.

Updated: May 22, 2021, 06:46 PM IST
रायगड समुद्र किनाऱ्यावर दोन दिवसांत 5 मृतदेह आले वाहून

रायगड : रायगड समुद्र किनाऱ्यावर दोन दिवसांत 5 मृतदेह वाहून आले आहेत. अलिबाग तालुक्यात शनिवारी 4 तर मुरूड येथे शुक्रवारी रात्री 1 मृतदेह आढळला. मुरुड, नवगाव, आवास, दिघोडी येथे हे मृतदेह आढळले. तौक्ते चक्रीवादळादरम्यान खोल समुद्रात बेपत्ता झालेल्या पी-305 ताराफ्यावरील खलाशांचे मृतदेह असण्याची शक्यता आहे. आढळून आलेले पाचही मृतदेह पुरुषांचे असल्याची माहिती आहे.

पाचही मृतदेहाचे वर्णन बेपत्ता व्यक्तींशी मिळते जुळते आहे. मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. ओएनजीसीचे पथक नातेवाईकांसह रायगडकडे रवाना झाले आहे. मुंबई पोलीसही त्यांच्या संपर्कात आहे. अशी माहिती मिळते आहे.

मुंबई जवळच्या अरबी समुद्रात बार्ज पी 305 हे जहाज तौक्ते चक्रीवादळादरम्यान बुडालं होतं. बुडत असताना अनेकांनी जहाजातून समुद्रात उड्या घेतल्या. लाईफ सेवर जॅकेटच्या मदतीने अनेक जण 11 तास समुद्रात होते. नौदलाच्या मदतीने अनेकांना वाचवण्यात यश आलं. पण आतापर्यंत 60 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. तर काही जण अजूनही बेपत्ता आहेत.