शशिकांत पाटील / लातूर : लॉकडाऊनमध्ये ग्रामीण भागातील कोरोना रुग्ण शहरात उपचारासाठी आल्यानंतर त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची मोठी तारांबळ होत होती. हे पाहून लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर येथील पाच तरुणांनी कोविड रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोफत जेवणाचा डबा देण्याचा ठरविले.आणि दररोज 150 ते 200 डबे तर गेल्या महिन्याभरापासून तीन हजार डबे या तरुण अन्नदूतांनी गरजूपर्यंत पोहोचवले आहेत. अहमदपूरच्या तरुणांने सामाजिक बांधिलकी जपली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका हा खेड्या-पाड्यातील रुग्णांना मोठ्या प्रमाणात बसला. त्यामुळे उपचारासाठी ग्रामीण भागातील नागरिक हे उपचारासाठी शहरात येतात. पण शहरात उपचार तर मिळत होते पण कोरोना रुग्ण आणि नातेवाईकांची दोन वेळेच्या जेवणाची मोठी गैरसोय होत होती. हेच लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर येथील विलास शेटे, शंकर मुळे, नयुम शेख, गोपीनाथ जायभाये आणि माधव भदाडे या पाच तरुणांनी हेरले. त्यामुळे कोरोना रुग्ण आणि नातेवाईकांसाठी दोन वेळच्या जेवणाचा डबा देण्याचे या तरुणांनी ठरविले.
यासाठी या पाचही जणांनी काँट्रीब्युशन करून काही रक्कम जमा केली आणि कोविड रुग्णांसाठी जेवणाचे डबे बनविण्यास सुरुवात केली. वरण, भात, भाजी, तीन चपाती, खीर, सलाद आणि शेंगदाने अशा पद्धतीचे जेवण या डब्यात असते. 26 एप्रिलपासून अहमदपूर शहरातील चार कोविड हॉस्पिटल, शासकीय ग्रामीण रुग्णालय,रस्त्यावरील मनोरुग्ण तसेच होम आयसोलेशनमधील रुग्णांसाठी दररोज 150 ते 200 डब्यांनुसार आजवर तीन हजार डबे पुरविण्यात आले आहेत.
कोविड हॉस्पिटल आणि इतर रुग्णालयात गरजूंपर्यंत हे तरुण दुपारी 12 आणि संध्याकाळी 8 वाजता स्वतः जाऊन डबे पुरवतात. त्यामुळे कोविड रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना दोन वेळचे उत्तम प्रतीचे, रुचकर जेवण मिळत मिळतं. एकीकडे लॉकडाऊनमध्ये जेवण कसे आणायचे हा मोठा प्रश्न रुग्णांच्या नातेवाइकांपुढे होता. मात्र या पाच तरुणांनी जेवणाची मोठी अडचण सोडविल्यामुळे रुग्ण आणि नातेवाईक या तरुणांचे आभार मानत आहेत.
सुरुवातीचे काही दिवस या पाच अन्नदूतांनी स्वखर्चातून या जेवणाच्या डब्यांचे नियोजन केले. त्यासाठी दररोज 10 हजारांचा खर्च येत असे. मात्र या तरुणांची सामाजिक बांधिलकी पाहून इतरही दानशूरांनी मदतीचा हात पुढे केलाय. त्यामुळे तरुणावरील आर्थिक भार कमी झाला असला तरी रुग्ण आणि नातेवाईकांसाठी ते स्वतःहुन पुढाकार घेऊन डबे पोहचवतात. त्यामुळे या अन्नदूत तरुणांचा आदर्श हा सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे एवढं मात्र नक्की.