महाड इमारत दुर्घटना : दोघांचा मृत्यू, आणखी काहीजण ढिगाऱ्याखाली

ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरु

Updated: Aug 25, 2020, 08:46 AM IST
महाड इमारत दुर्घटना : दोघांचा मृत्यू, आणखी काहीजण ढिगाऱ्याखाली  title=
छाया सौजन्य- एएनआय

रायगड: Mahad  महाड शहरात सोमवारी पाच मजली इमारत कोसळली आणि या दुर्घटनेनं साऱ्या राज्याचं लक्ष वेधलं. काजळपूरा भागात असलेल्या तारीक गार्डन असं या इमारतीचं नाव आहे. इमारत कोसळल्याची माहिती मिळताच तातडीनं बचाव कार्यास सुरुवात करण्यात आली असून, सध्याच्या घडीला ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. 

अनेक रहिवाशांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलं आहे. पण, अद्यापही काहीजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. ही १० वर्ष जुनी ही इमारत कोसळल्यामुळं या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला असून, आठजण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, इमारत कशामुळे कोसळली याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. 

दरम्यान, दुर्घटनेची माहिती मिळताच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे महाड घटना स्थळी दाखल झाले. यावेळी त्यांनी बचाव कार्याचा आढावा घेतला. त्यांच्याशिवाय पालकमंत्री अदिती तटकरे, स्थानिक आमदार भरत गोगावले, रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचीही घटनास्थळी उपस्थिती पाहायला मिळाली. 

अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीत राहणाऱ्या १९ लोकांना वगळून इतरांशी संपर्क झाला आहे. १९ लोक ढिगाऱ्याखाली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

 

महाड येथील या दुर्घटनाग्रस्त इमारतीत ४७ फ्लॅट्स होते. जवळपास २०० ते २५० जण या इमारतीत राहत असल्याची माहिती समोर आली आहे. सध्याच्या घडीला एनडीआरएफच्या 3 टीम घटनास्थळी पोहोचल्या असून, बचावकार्यास वेग आला आहे.