राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे मोठे भाकीत

 5 State Elections : राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आगामी पाच राज्यांच्या निवडणुकीबाबत मोठे भाकीत वर्तवले आहे.  

Updated: Mar 14, 2021, 02:11 PM IST
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे मोठे भाकीत  title=
संग्रहित छाया

मुंबई / बारामती :  5 State Elections : राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आगामी पाच राज्यांच्या निवडणुकीबाबत मोठे भाकीत वर्तवले आहे. भाजपला एकाच राज्यात कौल मिळेल आणि बाकीच्या चार राज्यांत पराभवाला सामोरे जावे लागेल, असेच चित्र सध्या दिसत आहे. हा भाजपचा (BJP) पराभव देशाला नवीन दिशा देणारा ठरेल, अशा शब्दात त्यांनी हे भाकीत वर्तवले आहे. पाच निवडणुकीच्या निकालानंतर देशात राजकीय गणिते बदलतील असा अंदाजही  यावेळी शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. ( 5 State Elections : BJP's Loss, After Five State Elections country will get new direction - Sharad Pawar)

आसाम वगळता अन्य चार राज्यांत भाजपचा पराभव होईल, असाच ट्रेंड दिसत आहे. भाजपचा पराभव देशाला नवीन दिशा देणारा ठरेल, असे पवार यांनी म्हटले आहे. आज बारामती येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पाच राज्यांच्या निवडणुकांची स्थिती सांगितली. त्यावेळी त्यांनी हे भाकीत केले. पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ममता बॅनर्जी यांची सत्ता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि केंद्र सरकार सत्तेचा गैरवापर करुन ममता बॅनर्जी यांच्यावर राजकीय हल्ला करण्याची भूमिका घेतली आहे. बंगाली संस्कृती आणि तेथील लोकांचे मन यावर आघात करण्याचा प्रयत्न कोणी केला, तर राज्य एकसंघ होते. आणि तशी प्रतिक्रीया व्यक्त होते, त्यामुळे येथे ममता यांचीच सत्ता येईल, हे स्पष्ट होत आहे, असे ते म्हणाले.

तर केरळचा विचार केला तर येथे भाजपची सत्ता येणार नाही. केरळमध्ये डाव्यांच्या सोबत राष्ट्रवादी आहे. या ठिकाणी डाव्यांची सत्ता निश्चित निर्विवाद बहुमतात येईल. तामिळनाडूमध्ये आज लोकांचा कल स्टॅलिन (डीएमके) यांच्या बाजूने दिसत आहे. स्टॅलिन हे तमिळनाडूची सूत्रे हाती घेतील अशी स्थिती दिसत आहे. तर आसाममध्ये भाजपची स्थिती तुलनात्मक चांगली आहे, तेथे त्यांचा विजय होईल असे वाटते, असे पवार म्हणाले.

दिल्लीतील शेतकरी आंदोलनासंदर्भात केंद्र सरकारने समंजसपणाची भूमिका न घेतल्याने लोकसभा आणि राज्यसभाही चालू शकली नाही. याबाबत उद्याच्या अधिवेशनात काय होते ते पाहू या, असे पवार म्हणाले. कृषी कायदा विरोधी आंदोलनावर शेतकरी जसे अस्वस्थ आहेत, तशीच संसदही अस्वस्थ आहे. त्यामुळे उद्या याबाबत काही प्रतिक्रीया उमटू शकते, असे कुणी म्हटले तर ते चुकीचे नाही, असे पवार म्हणाले.

शेतकऱ्यांना खलिस्तानवादी बोलणे हे बेजबाबदारपणे आहे, असे बोलणे हे काही लोकांचे वैशिष्ट्य आहे. शेतकऱ्यांप्रती अशी भाषा जे करतात त्यांना महत्व का द्यायचे, असा सवाल पवार यांनी उपस्थित केला. दरम्यान, भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी शेतकऱ्याना खलिस्तानवादी म्हटले होते.