मुंबई : कोरोना (Coronavirus) काळात मिळणाऱ्या भत्त्यात वाढ करावी, या मागणीसाठी आशा वर्कर्स संपावर गेल्या आहेत. (Asha workers strike) राज्यातील सुमारे 70 हजार आशा वर्कर्स आजपासून संपावर गेल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. दरम्यान, आश्वासनानंतरही आंदोलन करणे चूक आहे, अशी प्रतिक्रिया आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तर कोरोना संकटात आशा वर्कर्सना संप करावा लागणं दुर्दैवी, असल्याचे ट्विट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
राज्यात आशा वर्कर्स आरोग्य सेवेचे काम करत आहेत. मात्र, अल्प मोबदल्यात त्यांना काम करावे लागत आहे. कोरोना काळात मिळणाऱ्या भत्त्यात वाढ करावी, या मागणीसाठी त्यांनी संप पुकारला आहे. राज्यातील लसीकरणात महत्त्वाची भूमिका असलेल्या आशा वर्कर्सच्या संपामुळे कामकाजाला खीळ बसत आहे. राज्य सरकार योग्य निर्णय घेईल, असे आश्वासन दिल्यामुळे आंदोलन करणं चूक असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, राज्यव्यापी संपाला पाठींबा देण्यासाठी नांदगावमध्ये आशा स्वयंसेविकांचे निर्दशने केली आहेत. सेवेत कायम करण्यासह विविध मागण्या यावेळी त्यांनी केल्यात. राज्यभरातील आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तक विविध प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवारपासून बेमुदत संपावर असून या संपात नांदगांव तालुक्यातील आशा स्वयंसेवीका आणि गट प्रवर्तक देखील सहभागी झाल्या आहेत.
आशा स्वयंसेविकेंकडून ७२ वेगवेगळ्या प्रकारची कामे करून घेतली जातात.त्या कामाच्या बदल्यात मात्र तुटपुंजे असे मानधन दिले जाते. कामाच्या मोबदल्यात जे मानधन दिले जाते ते न देता वेतन देण्यात यावे. आशा स्वयंसेविकांना कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात येऊन शासकीय सेवेत कायम कराव्या अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी पंचायत समिती कार्यालयासमोर निदर्शने करीत संपाचे निवेदन स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आले.