बारामती : बारामतीमध्ये आठ महिन्याच्या बाळाला डॉक्टरांनी जीवदान दिले आहे. एका आठ महिन्याच्या बाळाने जोडवे गिळल्याने बाळाला त्रास होऊ लागला. खेळत असताना आईच्या पायातील जोडवे गिळलेल्या आठ महिन्यांच्या बाळाला बारामतीतील डॉ. सौरभ निंबाळकर यांनी जीवदान दिले.
बाळाने आईच्या पायातील जोडवे गिळल्याचे सुरवातीला कोणाच्या लक्षात आले नाही मात्र त्याला नंतर श्वास घ्यायला त्रास होऊ लागला, बाळाचे दूध पिणेही अचानकच बंद झाल्यानंतर पालकांनी बालरोगतज्ज्ञ डॉ. सौरभ मुथा यांच्याकडे धाव घेतली.
या बाळाचा एक्स रे काढल्यानंतर त्याच्या घशात हे जोडवे असल्याचे दिसल्यानंतर त्यांनी तातडीने निंबाळकर हॉस्पिटलमध्ये त्यांना पाठवले. डॉक्टरांनी बाळाच्या घशात अडकलेले जोडवे बाहेर काढले. आता बाळाची प्रकृती स्थिर आहे.
लहान मुले खेळत असताना त्यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामुळे लहान मुलांंना कधीही एकटं सोडू नये.