आशिष अंबाडे, झी मीडिया, गडचिरोली : गडचिरोली पोलिसांनी २२ एप्रिलला भामरागड तालुक्यातील बोरिया जंगलात देशातील सर्वात मोठे नक्षलविरोधी अभियान राबवले. यात ३४ नक्षली मारले गेले. मात्र अभियानाच्या १५ दिवसांनंतर या मोहिमेतील काही अनुत्तरित प्रश्न स्थानिकांना अस्वस्थ करत आहेत. चकमक स्थळापाशी असलेल्या गट्टेपल्ली गावातील ८ ग्रामस्थ त्या दिवसापासून बेपत्ता आहेत. कुटुंबियांनी गडचिरोलीत असलेले मृतदेह ओळखण्यास नकार दिला आहे.
२२ एप्रिलला गडचिरोलीत सी ६० कमांडोंनी ३४ नक्षल्यांचा खात्मा केला. देशातलं हे सर्वात मोठं नक्षलविरोधी अभियान होतं. बोरिया जंगलात पोलिसांनी ही मोठी कारवाई केली. इंद्रावती नदीपात्रात असलेला नक्षली तळ उध्वस्त केला. यात नक्षल्यांचे साईनाथ आणि श्रीनिवास हे २ मोठे कमांडर्सही मारले गेले. चकमकस्थळापासून अगदी जवळ गट्टेपल्ली हे गाव साईनाथचं मूळ गाव. या गावात साईनाथची जा ये होती. या प्रभावामुळे हे गाव पोलिसांना फारसं सहकार्य करत नसे. एटापल्ली तालुक्यातील या गावातून जवळच्याच कसनासूर इथे एका लग्नासाठी गावातले ८ ग्रामस्थ चकमकीच्या आदल्या दिवशी निघाले. मात्र सूत्रांच्या मते हे आठही जण कमांडर साईनाथला भेटण्यासाठी किंवा दलममध्ये सामील होण्यासाठी निघाले असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी तळाला घेराव घातल्यावर चकमकीत हे ग्रामस्थ मारले गेले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आता हे ८ ग्रामस्थ ना घरी परतलेत, ना लग्नात सहभागी झालेत ना शवांमध्ये त्यांची ओळख झालीय. या ८ ग्रामस्थांपैकी एकमेव महिला गुज्जी मडावीची ओळख कशीबशी पटल्याने तिचा दफनविधी करण्यात आला, मात्र तिचे कुटुंबीय अजूनही हा मृतदेह तिचाच असल्याची खात्री देत नाहीयेत. अन्य शव कुजलेली असल्याने ओळख पटवण्यापलीकडे गेली आहेत. त्यामुळे कुटुंबीयांनी ओळखण्यास नकार दिलाय. बेपत्ता ग्रामस्थांच्या नातेवाईकांना ते परत येण्याची आशा आहे. मात्र हे आठही जण समारोहाला आलेच नाही अशी पुष्टी इतर लोकांनी दिलीय. आता या मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी बेपत्ता झालेल्यांचे कुटुंबीय आणि मृतदेह यांचे डीएनए तपासले जाणार आहेत.
नक्षली कमांडर साईनाथ आपल्या गावाशी नाळ टिकवून होता. गावातल्या तरूणांना त्याने दलममध्ये सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं होतं. गावाच्या अगदी जवळ तळ असल्याने त्याने या सर्वांना तळावर बोलावलं असल्याची शक्यता पोलिसांना वाटते आहे. चकमकीच्या १५ दिवसांनंतरही या मृतदेहांवर अंत्यसंस्कार झालेले नाहीत. तसंच गट्टेपल्ली ग्रामस्थांना आजही आपल्या कुटुंब सदस्यांची प्रतीक्षा आहे.