परभणीत 80 हजार कोंबड्या मारणार : पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार

सात राज्यानंतर महाराष्ट्रातही बर्ड फ्लूचा शिरकाव 

Updated: Jan 11, 2021, 10:48 AM IST
परभणीत 80 हजार कोंबड्या मारणार : पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार title=

मुंबई : सात राज्यानंतर महाराष्ट्रातही बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे. परभणीत मुरुंबा गावात 800 कोंबड्यांचा बर्ड फ्लूने मृत्यू झालाय.  तर सेलू तालुक्यातील कुपटा गावात 500 कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. भोपाळच्या राष्ट्रीय प्रयोग शाळेने ही माहिती दिली. मुरुंबा आणि कुपटा गाव बर्ड फ्लू संसर्गित म्हणून घोषित केले आहे. गावात १ किलोमीटरच्या आतल्या कोंबड्या, पाळीव पक्षी नष्ट करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत. १० किलोमीटर अंतरापर्यंत कोंबडी खरेदी-विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.  तसेच गावातल्या लोकांची वैद्यकिय तपासणी केली जाणार आहे.

केरळ, राजस्थान, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा, गुजरात आणि उत्तरप्रदेशनंतर आता महाराष्ट्रातही बर्ड फ्लूचा धोका वाढला आहे.  पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी पत्रकार परिषदेत राज्यातील बर्ड फ्लूच्या संसर्गाबाबत माहिती दिली आहे. २००६ पेक्षा आत्ताचा बर्ड फ्लू वेगळा आहे त्यामुळे कोणत्याही पोल्ट्रीचालकांनी माहिती लपवू नये असं आवाहन पशू संवर्धनमंत्री सुनील केदार यांनी केलं आहे. एकटया परभणी जिल्ह्यात ८० हजार कोंबड्या माराव्या लागणार आहेत असं त्यांनी म्हटलं आहे. 

७० ते ८० डिग्री सेल्सिअसवर चिकन अर्धातास शिजवून खाण्यास हरकत नाही असं सुनील केदार यांनी स्पष्ट केलं आहे. पुणे आणि नागपुरात भोपाळच्या लॅबच्या तोडीची लॅब तयार कऱण्यात आलीय. तिथे सँपल टेस्टींगची परवानगी लवकरच मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

कोरोनाचं संकट संपत नाही. त्यात आता बर्ड फ्लूचं संकट उभं राहिलं आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे.